राजुरा : राजुरा व जिवती तालुक्यात आरोग्य सेवा कोलमडली असून आरोग्य अधिकाऱ्याच्या काम चलावू धोरणामुळे ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया वर नियंत्रण मिळालेले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राजुरा तालुक्यातील डोंगरगाव, टेंभुर्वाही, सोनुर्ली, सिर्सी, भेंडाळा, लक्कडकोट, कोष्ठा, बेरडी, नवेगाव, चिंचाळा, तुलाना यासह अनेक ग्रामीण वस्त्यामध्ये डेंग्युसदृष्य तापाची साथ सुरू असून वेळेवर उपचार न झाल्यामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. राजुरा तालुका आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे.जिवती तालुक्यातील भारीसह अनेक गावांमध्ये तापाची साथ असून डॉक्टर नसलेल्या ठिकाणी आरोग्य सेविकेकडून रुग्णांना लुटत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून अनेक गावांमध्ये अस्वच्छता असल्यामुळे रोगराई पसरत आहे. ग्रामपंचायतीच्या नाल्या वर्षानुवर्ष स्वच्छ न केल्यामुळे यामध्ये डासांचा प्रादूर्भाव होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता, गरिबी यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. राजुरा, जिवती तालुक्यात आरोग्य सेवा कोलमडली असून या जीवनाशी निगडित समस्येकडे लक्ष पुरविण्याची नागरिकांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
राजुरा, जिवती येथे आरोग्य सेवा कोलमडली
By admin | Updated: September 29, 2014 00:42 IST