हरदोना : राजुरा-गोवरी मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने रस्ता अपघातात कमालीची वाढ झाली आहे. मागील तीन- चार महिन्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी केली. मात्र चारच महिन्यात राजुरा- गोवरी मार्गाची पुन्हा मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.राजुरा- गोवरी मार्गाची डागडूगी तीन-चार महिन्यापूर्वी करण्यात आली. मात्र डागडुजी करताना डांबरी रस्त्यावरील खड्डे गिट्टी मुरुम टाकून भरण्यात आले. यात डांबराचा कोणत्याही प्रकारे वापर करण्यात आला नाही. रस्त्यावरील खड्डे केवळ गिट्टी, मुरुम टाकून बुजविल्याने अवघ्या काही दिवसांत हा रस्ता जैसे थे झाला आहे. याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठे जिवघेणे खड्डे पडले असल्याने दिवसेंदिवस अपघाताच्या घटनात वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वीच रामपूर येथील एक दुचाकीस्वार खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी झाला. गोवरी कोळसा खाणींची वाहतूक या मुख्य मार्गाने होत असल्याने ट्रकांच्या धुळीने हा मार्ग बरबटलेला असतो. या मार्गाने दिवस-रात्र कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांममुळे रस्ता अपघातात मोठी वाढ झाली आहे.कोळसा खाणींमुळे राजुरा तालुक्याचे नाव नकाशात वर असले तरी येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. राजुरा- गोवरी मार्गाची केवळ गिट्टी मुरमाने डागडुजी केल्यामुळे डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी भास्कर जुनघरी, गणपत लांडे, संजय जुनघरी, प्रदीप पिंपळकर, प्रमोद लांडे, विकास पिंपळकर, विकास पाचभाई, बंडू जुनघरी, सचिन लांडे, अमित रणदिवे, श्रीधर जुनघरी, गणेश सातपुते, शुभम जुनघरी यांनी केली आहे. (वार्ताहर)
राजुरा- गोवरी मार्ग पुन्हा उखडला
By admin | Updated: October 30, 2014 22:50 IST