चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभिड आदी तालुक्यात रोजगाराच्या पाहिजे तशा संधीच नसल्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य पसरले आहे. त्यामुळे या तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्धल करून देण्याची मागणी केली जात आहे.
गोंडपिपरी तालुका हा आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात वर्षाकाठी शेती व्यवसायामधून ३ ते ४ महिने फक्त रोजगार उपलब्ध होतो. तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या हजारोच्या घरात आहे. दरवर्षी हजारो सुशिक्षित बेरोजगार रोजगार शोधण्यासाठी शहर विभागाकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे करंजी, तसेच तालुक्यामध्ये लघू उद्योगामार्फत रोजगार उपल्बध करून देणे गरजेचे झाले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील काही वर्षांपूर्वी औद्योगिक विकास महामंडळाने लघू उद्योग उभारण्याकरिता जागा खरेदी केली आहे. त्याचे सर्वेक्षणही झाले आहे, परंतु त्या जागेवरती लघू उद्योग सुरू झालेला नाही. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून एमआयडीसी होण्यासंदर्भात मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अशीच अवस्था इतरही तालुक्यांतील आहे.