लोकमत न्यूज नेटवर्कचारगाव खदान: जगात कोण कोणत्या वेळेला, कोणत्या कामासाठी समोर येईल हे सांगता येत नाही. कुणी त्याला ईश्वराचा अवतार, येशूचा दूत वा पैगंबराचा प्रेषित संबोधेल. हा ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. मात्र आज सुद्धा जगात भेदभाव विरहीत समाज सेवेचे व्रत घेतलेले अनेक सज्जन आहेत. यात संभाजी मोहीतकर यांचेही नाव जोडले गेले.एकता नगर (वेकोली वसाहत) विंजासन मार्गावरील सातपुते यांच्या शेताजवळील रस्त्यावर विट्टा भट्टीसाठी ट्रक भरुन काळी माती नेत असताना तिथे पडली. त्यातच रिमझिम पाऊस सुरु झाला. ती माती पाण्याने, चारचाकी, दुचाकी वाहनाने, गुरांच्या पायाने रस्त्यांवरती हळूहळू पसरु लागली. माती चिकट असल्याने त्यावरुन जाणारे वाहन, सायकलस्वार व पायी जाणारे घसरुन पडू लागले. जवळपास १० ते १२ वाहन चालक घसरुन पडलेत. ये-जा करणाऱ्यांना तिथे माती असल्याची कल्पना नव्हती. त्यातच रिमझिम पावसामुळे काही कळायला मार्ग नव्हता. यात कुणाला पायाला, हाताला, कमरेला मार लागला. तर काहींच्या वाहनाचे नुकसान झाले. अंधार होत असताना एकता नगर निवासी संभाजी मोहीतकर हे भद्रावतीवरुन दुचाकीने येताना त्या ठिकाणावरुन पडताना बचावले. यानंतर त्यांनी या ठिकाणी अन्य वाहनचालक पडून जखमी होऊ नये म्हमून आपल्या वाहनाचे लाईट सुरू करून त्या मातीवर प्रकाश टाकला. ये-जा करणाऱ्या वाहकांना थांबवून तेथून सांभाळून वाहने काढण्यासाठी मदत करू लागले. किशोर ठेमस्कर त्यांच्या मदतीला धावून आले. यानंतर संभाने आपल्या मुलाला व गुरुनुले नामक मित्रालाही बोलावून घेतले. या सर्वांना सोबत घेऊन संभाने सोबत घेऊन आजू-बाजूची काटेरी झुडूपे तोडून रस्त्यावर टाकली. एकाने वाहकांच्या वाहनाच्या प्रकाशात चमकले पाहिजे म्हणून लाल रंगाचे तोरण आणून टाकले. या मार्गावरुन वेकोलि एकतानगर वसाहत, चारगाव, कुनाडा, देऊळवाडा, माजरी, विंजासन, भद्रावती तसेच खाण कामगार, शेतकरी, शालेय मुले-मुली ये-जा करतात. रात्री १० च्या दरम्यान माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांना काही नागरिकांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क करुन साफ-सफाईसाठी दोन कामगार पाठविले. रस्ता साफ झाला. यामुळे वाहनधारकांचा संभाव्य धोका टळला.
अन् संभामुळे टळला संभाव्य धोका
By admin | Updated: June 16, 2017 00:39 IST