जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांना अनेक ठिकाणी बेड उपलब्ध असूनही माहिती उपलब्ध होत नाही. परिणामी, गंभीर रुग्णांना हॉस्पिटलसाठी शहरात फिरावे लागत होते. त्यामुळे प्राथमिकतेनुसार आयसीयू, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळावे, यासाठी सोमवारी चंद्रपूर कोविड १९ पेशन्ट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. यात कोविड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयाने रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड करायची आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांना बेड उपलब्ध करून संबंधित हॉस्पिटलमध्ये थेट जाऊन उपचार घेतील. शहरातील सर्व कोविड हॉस्पिटल रुग्णांना परस्पर दाखल करून घेता येणार नाही. या प्रणालीवर नोंदणी केलेल्या प्रतीक्षा यादीतीलच रुग्णांना भरती करून घेतील. यामुळे गरजू रुग्णांना बेड उपलब्ध होणार आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
बॉक्स
पोर्टलद्वारे ५६ रुग्णांना मिळाले बेड
जिल्ह्यात कोराेना रुग्णांना चंद्रपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात सहजरीत्या ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने पोर्टल कार्यान्वित केले. या पोर्टलवर मंगळवारी सायंकाळपर्यंत १२० रुग्णांनी बेडसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५३ रुग्णांना ऑक्सिजन तर तीन रुग्णांना आयसीयू असे ५६ रुग्णांना बेड प्राप्त झाले आहे. २९ रुग्णांनी नोंदणी केल्यानंतर बेड घेण्यास नकार दिला तर ३५ रुग्ण बेडसाठी प्रतीक्षा यादीत आहेत.