शहर हळहळले : ११ दिवस दिली मृत्यूशी झुंजचंद्रपूर : दुर्गापूर येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ईयत्ता दुसऱ्या वर्गात शिकणारा गौरव दुधनाथ चव्हाण (रा. वेकोलि वसाहत दुर्गापूर) हा विद्यार्थी शाळेच्या दुसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता. ४ मार्चला घडलेल्या या दुर्घटनेनंतर त्याच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गौरवचे सोमवारी निधन झाले. या घटनेने चंद्रपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी गौरवचे पार्थिक दुर्गापूर येथे आणण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गौरवने स्वत: उडी घेतली की, तो घसरून पडला, स्वत: उडी घेतली तर त्या मागील गंभीर कारण कोणते, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. दुधनाथ चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या गौरवच्या अशा अकाली मृत्यूने संपूर्ण चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नेमके त्या दिवशी काय घडले, याची विचारणा करण्यासाठी सेंट मेरी कॉन्व्हेंटच्या प्राचार्य सिस्टर आदर्श यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता, त्या दिवशी गौरवच्या शिक्षिकेने रागावल्याची बाब त्यांनी फेटाळून लावली. ४ मार्च रोजी वर्गात दुसरा तास सुरू असताना पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये वर्गात बसून असलेला गौरव अचानक मी चाललो असे सांगून धावत दुसऱ्या माळ्याच्या टेरेसवर पोहचला आणि तेथून तो खाली पडला, असा दावा प्राचार्य सिस्टर आदर्श यांनी केला आहे. मात्र अचानक धावत दुसऱ्या माळ्याच्या टेरेसवर पोहचला अन् तो खाली पडला, ही घडमोड घडण्याचे नेमके कारण काय, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. वर्गात अध्यापनाचे काम सुरू असताना अचानक दुसऱ्या माळ्यावर जाण्याची इच्छा गौरवच्या मनात का जागृत झाली, या प्रश्नाचेही उत्तर शोधणे आता गरजेचे झाले आहे. १५ दिवसांपासून कौटुंबिक कारणाने गौरव शाळेत गैरहजर होता. या कालावधीनंतर २ मार्चला तो शाळेत आला. त्यानंततर दोन दिवसांतच ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर गौरवला बेशुद्धावस्थेत तुकूममधील क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून त्याला नागपूरला हलविण्यात आले. मात्र सोमवारी त्याचे उपचारादम्यान निधन झाले. (वार्ताहर)गौरव १५ दिवसांपासून शाळेत गैरहजर होता. २ मार्चला तो सुटीचा अर्ज घेऊन शाळेत दाखल झाला. ४ मार्च रोजी वर्गात दुसरा तास सुरू असताना शिक्षिकेने रॉंग आॅर्डरमधील स्टोरी करेक्ट आॅर्डरमध्ये करण्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. चार पाच विद्यार्थ्यांनी ती बरोबर केली. उर्वरित मुलांना पुन्हा ते करण्यासाठी शिक्षिकेने सांगितले. त्यानंतरही काही मुलांनी ती अॅक्टीव्हीटी बरोबर केली नाही. त्यात गौरवचाही समावेश होता. त्यानंतर संबंधित शिक्षिकेने प्रत्येक मुलांजवळ जाऊन प्रेमाने त्यांच्याकडून ती अॅक्टीव्हीटी व्यवस्थित करून घेतली. मात्र त्यानंतर पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये ही दुर्घटना घडली. गौरवने उडी घेतली की तो खाली पडला, हे मात्र आम्हाला कुणालाच माहित नाही. -सिस्टर आदर्श, सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल, दुर्गापूर
तिसऱ्या माळ्यावरून पडलेल्या गौरवचे निधन
By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST