५ सप्टेंबरला दिल्लीत गौरव : लोकसहभागातून राबविले उपक्रमकोरपना : हिरापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर मडावी यांना यावर्षीचा राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हिरापूर येथील जिल्हा परिषद शाळा आय.एस.ओ. करण्यापूर्वी ग्रामीण गुणवत्ता विकास कार्यक्रमामध्ये सतत शाळेत तीन वर्षे द्वितीय क्रमांक पटकाविला. या शाळेत दोन शिक्षक कार्यरत असताना लहानशा आदिवासी, नक्षलग्रस्त गावात तसेच गाव शेजारी इंग्रजी माध्यमाची अल्ट्राटेक कंपनीची इंग्रजी माध्यमाची शाळा व जवळच खासगी हायस्कूल असतानाही आपल्या गावचा विद्यार्थी गावच्या शाळेत शिकला पाहिजे, त्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार जीवनापयोगी शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी शाळेत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले. लोकसहभागातून शाळा डिजिटल केली. चारही वर्ग मोबाईल डिजिटल केले. शाळेत दोन ई- लर्निंग संच लोकसहभागातून मिळविले. शाळेत सुसज्जा विज्ञान प्रयोगशाळा, खेळ साहित्य, संगणक संच, साऊंड सिस्टिम, बगीचा अशा प्रकारे लोकसहभागातून त्यांनी शाळा सुंदर बनविली. शाळेत लोकांचा सहभाग वाढला. मागील वर्षी शिन नवचेतनामध्ये चेतना शाळा म्हणून हिरापूर शाळेची निवड झाली .२०१५ मध्ये त्यांना जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांची सेवा १७ वर्षे झाली असून या काळात जि.प. शाळाकडे दुर्लक्ष होत असताना त्यांनी आपली शाळा आयएसओ करून शाळाकडे लोकांचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. लोकसहभाग, ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीची साथ मिळाल्यामुळे त्यांची शाळा आदर्श व शैक्षणिक मॉडेल ठरली आहे. ते शाळेत ‘शोध एकलव्याचा’ हा प्रभावी उपक्रम रावबून हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन दरवर्षी त्याचा सत्कार करण्यात येतो. ते शाळेत विविध प्रकारचे असे ५२ उपक्रम राबवितात. त्यांनी स्वत:ला पूर्णपणे शालेय काम व विद्यार्थ्यांकरिता झोकून दिले आहे.त्यांच्या कार्याची नोंद घेवून राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराकरिता निवड झाल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या कार्यालयातून पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. सुधाकर मडावी यांना ५ सप्टेंबरला सन्मानपत्र व ५० हजार रुपये रोख देऊन नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात गौरविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
सुधाकर मडावींना राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराची घोषणा
By admin | Updated: September 2, 2016 01:02 IST