चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहे. या समस्या सोडविण्यासाठी सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पार पडलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला लवकरच गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रदूषणाचा प्रश्न अव्वल आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करणाऱ्या झाडांची लागवड करण्यावर प्रथम भर देण्यात येणार आहे. याशिवाय पर्यटनाचा विकासासाठी ताडोबाचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमाप्रसंगी दिली. मागील अनेक दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडला आहे. वैद्यकीय महाविद्यालय कोणत्याही परिस्थितीत २०१५ मध्ये सुरु होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यामध्ये सुंदर होईल असा बॉटनिकल गार्डन चंद्रपुरात तयार करण्यात येणार आहे.पर्यटनाच्या माध्यमातून महसूल जमा करता येतो. जिल्ह्यात ताडोबासारखे पर्यंटन स्थळ आहे. यामध्ये वाघांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुुळे ताडोबासह राज्यातील अन्य ठिकाणीही पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण भर देवू, असे मुनगंटीवार म्हणाले.शासकीय योजना जनतेच्या हितासाठी असते. मात्र त्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत नाही. आता मात्र प्रत्येक शासकीय कामात काटेकोरपणा पाळण्यात येणार असल्याने नागरिकांना त्रास होणार नाही, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पत्रकार संघाच्या भवनाचे अत्याधुनिकरण करण्यासाठी निधी देण्याची विनंती यावेळी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. पत्रकार वसाहतीच्या प्र्रस्तावाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असता मुनगंटीवार यांनी अत्याधुनिक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने भवन तसेच पत्रकार वसाहतीच्या प्रस्तावासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, प्रमोद कडू उपस्थित होते. ‘मीट द प्रेस’चे प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे सचिव मंगेश खाटीक, संचालन आशिष आंबाडे तर, आभार जितेंद्र मशारकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करा
By admin | Updated: November 4, 2014 22:37 IST