चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. असे असताना संबंधितांचा पदभार हा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे देणे अपेक्षित असताना हा पदभार चक्क केंद्रप्रमुखाकडे देण्यात आल्याचा प्रकार वरोरा पंचायत समितीमध्ये घडला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विस्तार अधिकारी असतानाही केंद्रप्रमुखाकडे पदभार कसा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील शिक्षण विभागाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे असते. मात्र मागील वर्षभरापासून पंधराही तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. त्यामुळे हा पदभार ज्येष्ठ असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे देणे अपेक्षित असते. मात्र वरोरा पंचायत समिती याला अपवाद ठरली आहे. येथील पंचायत सिमितीचा प्रभार जिवती पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे होता. मात्र त्यांच्याकडील प्रभार काढण्यात आला आहे. त्यामुळे हा पदभार येथील विस्तार अधिकाऱ्यांकडे देणे अपेक्षित असताना केंद्रपमुखाकडे देण्यात आला आहे. या प्रकारामुळे विस्तार अधिकारी संघटनेमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे पदभार देताना ज्येष्ठतेनुसार देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
बाॅक्स
शिक्षण समितीच्या बैठकीत ओढले ताशेरेजिल्हा परिषद शिक्षण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्येही या विषयाला घेऊन चर्चा रंगली. शिक्षण समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याची माहिती मिळाली. मात्र अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवून वेळ मारून नेल्याचे समजते.
बाॅक्स
जिल्ह्यात एकही गटशिक्षणाधिकारी नाही
जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कामाचे राज्यपातळीवर अनेकवेळा कौतुक झाले आहे. कोरोना काळातही विद्यार्थ्यांना स्वाधाय योजना, ऑनलाईन अभ्यासक्रम तसेच स्काॅलरशीलमध्येही विद्यार्थ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. एवढेच नाही तर जिल्ह्यातील विविध शाळांना स्पर्धात्मक तसेच अन्य पुस्तकांचा संच पुरविण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी लाभ होत आहे. मात्र शिक्षण विभागातील महत्वाचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असल्यामुळे अन्य अधिकाऱ्यांना कामाचा ताण वाढला आहे. त्यातच काही अधिकारी आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांकडे पदभार देत असल्यामुळे नाराजीत आणखीच वाढ झाली आहे.