रस्त्यावरील अंधार दूर करा
कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गावर पथदिवे नसल्याने परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरले असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वणी मार्गावर पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, तालुका क्रीडासंकुल आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.
रानडुकरांचा हैदोस
भद्रावती : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील काही गावातील शिवारात जंगली प्राण्यांनी शेतात धुमाकूळ सुरु केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेले पिकांचे प्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वनसडी ते पिपर्डा रस्त्यावर खड्डे
कोरपना : कोरपना तालुक्यातील वनसडी ते पकडीगुड्डम धरणाला जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर पिपर्डा, कारगाव, धनकदेवी, मरकागोंदी, जिवतीला जाण्याचा एकमेव मार्ग आहे. परिणामी रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
जनित्र बनले धोकादायक
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावात डीपी रात्रंदिवस सतत उघड्या राहतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
उड्डाणपूल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील वरोरा नाका परिसरात नव्याने उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. मात्र अद्यापही सुरू करण्यात आला नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. वाहतूक पोलीस कार्यालयाकडून येणाऱ्या पुलावरून थेट आंबेडकर कॉलेजपर्यंत या पुलामुळे येता येणार आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असतानाही पूल सुरू करण्यात आला नाही. परिणामी नागरिकांना फेरा घालून जावे लागत आहे.