रोगांचाही प्रादुर्भाव : कापसाचे बोंड काळे पडत आहेभद्रावती : भद्रावती तालुक्यात कापूस पिकाची अवस्था वाईट आहे. सध्या पऱ्हाटीचे बोंड फुटले असून सततच्या पावसामुळे कापूस ओला होत आहे. तसेच बोंड काळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. झाडांना मोठ्या प्रमाणात बोंड असल्याने पाऊस व वाऱ्यामुळे अनेक झाडे कोलमडली आहे. विविध रोगांचाही पिकांवर प्रादुर्भाव होत आहे. यामुळे यंदा तालुक्यात कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सध्या पऱ्हाटी सुकत चालली आहे. पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपेक्षित उत्पादन मिळणार की नाही, या विवंचनेत शेतकरी आहे. पऱ्हाटीवर अज्ञात रोग आला आहे.तालुक्यातील चिरादेवी, गोरजा, गवराळा, मांगली व अन्य खेड्यामध्ये पऱ्हाटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून विजेमुळे एकजण मृत्युमुखी पडल्याचीही घटना तालुक्यात घडली.पऱ्हाटीसोबतच पावसाळी मुंग व उडीद पिकही खराब होण्याच्या मार्गावर आहे. सोयाबिन काढायला आले असून या पिकालाही पावसाचा फटका बसला आहे. फक्त धान पिकाला पुरेसा पाऊस असून अन्य पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत भद्रावती तालुक्यात १२०० मिमी पाऊस पडला असून पावसाने सरासरी ओलांडली आहे. तालुक्यात पावसाची सरासरी १००० मिमी आहे. २१ ते २६ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचा पिकांवर परिणाम होऊन पिके खाली झुकली आहेत. (तालुका प्रतिनिधी)
भद्रावती तालुक्यात कापूस पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता
By admin | Updated: September 29, 2016 01:00 IST