चंद्रपूर : विविध कामासाठी जिल्ह्यातील नागरिक शासकीय कार्यालयात येतात. मात्र, या कार्यालयातील शौचालय व स्वच्छतागृहाची देखभाल होत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतागृहे वापरासाठी योग्य नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा व तालुकास्थळी विविध विभागांची शासकीय कार्यालये आहेत. वेळोवेळी विविध कामाकरिता नागरिकांना या कार्यालयात जावे लागते. परंतु येथील स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष झाल्याने घाण साचली आहे. काही ठिकाणातील शौचालयांना दरवाजे नाहीत तर बºयाच ठिकाणी पाण्याचा अभाव आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती आदी कार्यालयात स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नाही. त्यामुळे कचरा व घाण पडून असल्याचे नेहमीच निदर्शनात येते. मात्र याकडे कुणी लक्ष देत नाही.
मुख्य रस्त्यांना झुुडपांचा वेढा
कोरपना : तालुक्यातील अनेक मुख्य मार्ग व ग्रामीण रस्त्यावर झुडपे वाढली. त्यामुळे धोकादायक बनले आहेत. कोरपना ते वणी, पारडी ते खडकी (रुपापेठ), लोणी ते पिपरी, धानोली ते मरकागोंदी, कन्हाळगाव ते टागाळा, कोरपना ते कोडसी (बु), इंजापूर ते वडगाव, नारंडा ते अवाळपूर, लोणी ते शेरज, नांदगाव सुर्या ते जैतापूर, लखमापूर ते वरोडा, बाखर्डी ते निमणी, पिपर्डा ते वनसडी मार्गावर रस्त्यावर झुडपे वाढल्याने अरूंद झाले आहेत. झुडूपांमुळे समोरून एखादे वाहन आल्यास दिसत नाही. रात्रीच्या वेळीस तर या मार्गाने प्रवास करणे अत्यंत जिकरीचे ठरत आहे. नागरिक रात्रीच्या वेळेस प्रवास करणे टाळताना दिसत आहेत. रस्त्याचे व्यवस्थापन करण्याची जवाबदारी असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत.