गोवरी: राजुरा- कवठाळा मार्गावरील जुन्या पुलालगत बांधण्यात आलेले तब्बल सहा नवीन पुल प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. दिवसेंदिवस पुलावरील अपघाताच्या घटनांत वाढ होत असल्याने हे पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. राजुरा-गोवरी-कवठाळा मार्गावरील जुने सहा अरुंद पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलालगत वाहतुकीसाठी नवीन पूल बांधण्यात आला. मात्र त्याचे बांधकाम करताना दोन पुलांच्या मधोमध एक ते दीड फूटाचे अंतर सोडल्याने व पुलावर कोणतेही पक्के कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजुरा मार्गावरील माथरा गावाजवळ गोवरी, पोवनी, गावाजवळ दोन- दोन तर नांदगाव गावाजवळ एक असे एकूण सहा नवीन पूल बांधण्यात आले. जुन्या सहा अरुंद पुलांमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या पुलालगत अगदी पुल लागून न बांधता या दोन पुलामध्ये एक ते दीड फुटाचे अंतर ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही पुल वाहतुकीसाठी सुरु असून वाहतुकदारांना या दोन पुलाचा नेमका अंदाज येत नसल्याने दोन पुलांच्या मधोमध वाहन अडकून प्रसंगी जीव गमावण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. वाहतुकीसाठी वरदान ठरणाऱ्या पुलांमध्ये नवीन पूल बांधताना विशिष्ट अंतर ठेवल्याने हेच पुल आता नागरिकांच्या जिवावर उठत आहे. मागील आठवड्यात नांदगाव जवळ असणाऱ्या दोन पुलाच्या मधोमध कोळसा वाहतूक करणारा ट्रक फसला तर दोन दिवसांपूर्वीच गोवरी गावापासून काही अंतरावर असलेल्या अशाच दोन पुलाच्या मधोमध मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आदळल्याची घटना घडली.राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कोळसा खाणींमुळे राजुरा- कवठाळा मार्गावरुन दिवस-रात्र कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. प्रवासासाठी हे पूल सोईचे असले तरी दोन पुलांमधील अंतराने हे पुल धोकादायक ठरत आहेत. गोवरी, पोवनी गावाजवळील पूल अगदी रस्त्याच्या वळणावर बांधण्यात आल्याने या पुलावर अनेकदा मोठे अपघात घडले आहेत. (वार्ताहर)
कवठाळा मार्गावरील पूल धोकादायक
By admin | Updated: January 25, 2015 23:11 IST