ब्रह्मपुरी : शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कर्मचारी देवराव येनगुले यांचा स्वाईन फ्लूने मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे पॉलीटेक्नीकमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत भितीचे वातावरण पसरले असुन अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रह्मपुरी मध्ये स्वाईन फ्लूने देवराव येनगुले हे काल नागपूरच्या खाजगी दवाखान्यात मरण पावले. परंतु, देवराव येनगुले यांना या आजारासोबतच अन्य आजार असल्याचेही संंबधिताकडून सांगितले जात आहे. केवळ स्वाईन फ्लू हेच आजार मृत्यूला कारणीभूत नाही. परंतु, ते शासकीय तंत्रनिकेतन मध्ये कार्य करीत असल्याने स्वाईन फ्ल्यू विद्यार्थ्यांत पसरला असल्याचे समजून विद्यार्थ्यांनी मोठा धसका घेतला आहे. महाविद्यालयात जवळजवळ एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दुसऱ्या जिल्ह्यातील व अन्य राज्यातील सुद्धा विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या कानावर स्वाईन फ्ल्यूने येनगुले यांचा मृत्यू झाला, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या बातमीने बहुतांश विद्यार्थ्यांनी मूळ गावी जाणे सोईचे समजून आपल्या बॅगा भरून जावू लागले आहेत. महाविद्यालयासमोर फेरफटका मारला असता, काही विद्यार्थी तोंडाला मास्क लावून आढळून आले आहे. भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता, आम्हालाही स्वाईन फ्लू होणार म्हणून आम्ही आपल्या मूळ गावी जात असल्याची प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या चुकीच्या समजूतीने हा प्रकार चालविता आहे हे समजावून सांगितले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत विद्यार्थी दिसत नाही. स्वाईन फ्लू हा केवळ एका परिसरातच राहत नाही तर तो झपाट्याने सर्वदूर पसरतो. त्यामुळे आम्ही आपल्या गावाला जाणे पसंद केल्याचे विद्यार्थी बोलून दाखवित आहेत. (प्रतिनिधी)
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांमध्ये ‘स्वाईन फ्लू’ची धास्ती
By admin | Updated: February 13, 2015 01:25 IST