चंद्रपूर : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या १९ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे. या संघाच्या संचालक मंडळासाठी प्रथमच निवडणुका होत असून प्रचार, भेटीगाठी, सभा आणि आरोप-प्रत्यारोपामुळे या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे.३ हजार ७६४ सदस्यसंख्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये प्रथमच दोन पॅनल उभे ठाकल्याने मतदान पद्धतीने यावेळी निवडणुका होत आहेत. यात एकूण १५ संचालक आहेत. सत्ताधाऱ्यांचे विकास पॅनल आणि विरोधकांचे परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून एक अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवित आहे. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांची संख्या ३१ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. पुनमचंद वाकडे काम पहात आहेत.ज्येष्ठ नागरिक संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतानाही २००९ नंतर येथे निवडणुका झालेल्या नाहीत. ही बाब धर्मदाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी निवडणुकीचे आदेश दिले. या सोबत आर्थिक व्यवहारावरून कार्यकारिणीतील संचालकांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामळे दोन तट पडले. परिणामत: ज्येष्ठ नागरिक संघ प्रथमच निवडणुकीला सामोरा जात आहे. या दोन्ही पॅनलकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. परिवर्तन पॅनल गोपाळराव सातपुते यांच्या नेतृत्वात लढत असून त्यांनी भविष्यात स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासन देण्याचा दावा केला आहे. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गटाने सत्ताधाऱ्यांवर आर्थिक स्वरूपाचे आरोप केले. मागील अनेक वर्षात ज्येष्ठ नागरिक संघ वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही वाव दिला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संघाच्या घटनेचा अवमान करून आजवर कामकाज चालविण्यात आल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.दरम्यान, विकास पॅनलनेही शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. विजय चंदावार म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संघ वाढविण्यासाठी कुणी मेहनत केली हे सर्वांना माहीत आहे. सर्व राजकीय नेत्यांचे सहकार्य घेवून आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र काही सदस्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी करून निवडणुकीची मागणी केली. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली, असे ते म्हणाले. प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुकीला राजकीय रंग
By admin | Updated: January 16, 2016 01:20 IST