अवैध दारूविक्री प्रकरण : १० नोव्हेंबरला काढणार मोर्चातळोधी (बा.) : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू केली आहे. असे असताना तळोधी (बा.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर दिसून येतो. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तळोधी (बा.) येथील प्रत्येक चौकाचौकात दारु विकली जाते. त्यामुळे ही अवैध दारूविक्री तात्काळ थांबवा, या मागणीसाठी महिलांनी पोलीस चौकीला घेराव घातला.तळोधी (बा.) येथे मोठ्या प्रमाणात व्हीआयपी गाड्यामधून देशी- विदेशी दारु रात्री व काही वेळा दिवसाढवळ्या गावात उतरविली जात आहे. मात्र हे सर्व दारु विक्रेते कोण आहेत, कुठून दारु येते, हे पोलीस चौकीच्या सर्व कर्मचाऱ्यांना माहीत असताना या विभागाचे अधिकारी कुठलीही कारवाई करीत नाही. आम्ही दारुच्या भरपूर केसेस केल्या. आमच्याजवळ पोलीस स्टॉप कमी आहे, असे जनतेला पोलिसांकडून सांगितले जाते. अवैध दारु विक्रेते चौकीत येऊन अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून जात असल्याचा आरोपही गावकरी महिलांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ५ नोव्हेंबरला ग्रामपंचायत तळोधी (बा.) येथे अवैध दारु बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा पोलीस चौकीकडे वळविला. पोलीस चौकीला घेराव घालत पोलीस चौकीच्या समोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. तळोधी (बा.) पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक मस्के यांच्याकडे गावातील महिलांनी अवैध दारु विक्रेत्यांची नामावलीच सादर केली. गावातील व परिसरातील दारु विक्रेत्यांना चार दिवसात पकडून कारवाई केली नाही व संपूर्ण दारु बंदीचे पालन न केल्यास या विरोधात १० नोव्हेंबरला पोलीस चौकीवर महिला व पुरुषांच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशाराही दिला. (वार्ताहर)
पोलीस चौकीला महिलांचा घेराव
By admin | Updated: November 7, 2015 00:41 IST