राजुरा : राजुरा उपजिल्हा रुग्णालयात न्युमोनिया लसीकरणाची सुरुवात झाली असून दीड महिन्यावरील बालकांना ही लस घेता येईल. तालुक्यातील नागरिकांनी आपल्या बाळांना या लसीचे डोस देऊन संरक्षित करावे, असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एल. टी. कुळमेथे यांनी लसीकरण मार्गदर्शन कार्यक्रमात केले आहे.
छोट्या बालकांना श्वसनाचे आजार होऊ नये म्हणून सीपीव्ही देण्यात येते. नवजात बालके ( दीड महिना) यांना ही लस दिल्यास त्यांचे न्युमोनिया या आजारापासून संरक्षण होते. न्युमोनिया हा श्वसन प्रक्रियेत होणारा आजार आहे. त्यामुळे बालक संक्रमित झाल्यास बालक दगावू शकते. त्यामुळे बालकांना संरक्षित करण्याचे दृष्टीने सीपीव्ही लस राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच उपलब्ध झाली असल्याचे डॉ . एल. टी. कुळमेथे यांनी सांगितले. यावेळी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. डी. अरके, डॉ. आर. ए. यादव, डॉ. गायकवाड, डॉ. अमित चिदंमवार, डॉ. सुरेंद्र डुकरे आदी उपस्थित होते.