चंद्रपूर : विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज बुलंद करणारा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्रात विशेष ओळख निर्माण करणारे सुधीर मुनगंटीवार हे खरे लोकनेते आहे. विकास कामांची मोठी मालिका तयार करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी संसदीय संघर्षाच्या माध्यमातून अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडले आहे. आदर्श आमदार कसा असावा, याचे उत्तम उदाहरण मुनगंटीवार आहेत. लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीने सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे आमदार निवडून जाणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांनी केले. ९ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे आयोजित जाहीर सभेत डॉ. निशीगंधा वाड बोलत होत्या. विधानसभेत उपेक्षित, वंचितांचा आवाज बुलंद करताना त्यांनी समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक या सर्व क्षेत्रातील प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी संसदीय कौशल्य पणाला लावले आहे. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीत वचनाला जागणारा नेता अशी आपली ओळख सुधीर मुनगंटीवार यांनी निर्माण केली आहे. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करुन पुन्हा सर्व सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी विधानसभेत पाठवावे, असे आवाहन डॉ. निशीगंधा वाड यांनी केले.यावेळी मंचावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा वनिता कानडे, भाजपा चंद्रपूर महानगर सरचिटणीस रामपाल सिंह, जि.प. सदस्य शांताराम चौखे, हनुमान काकडे, लोकचंद कापगते, रंजना किन्नाके, माला रामटेके, सविता नवले, विलास टेंभुर्णे, हंसराज राजपुरे, दुर्गापूरच्या सरपंच सविता चंदनगोले, स्मिता नंदनवार आदी भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना भाजपा नेते रामपाल सिंह म्हणाले, विकास कसा असावा आणि विकासाभिमुख आमदार कसा असावा, याचा उत्तम आदर्श सुधीर मुनगंटीवारांनी निर्माण केला आहे. सुधीर मुनगंटीवारांसारखे लोकनेते आमचे आमदार आहेत, हे आमचे भाग्य आहे. या मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी सुधीर मुनगंटीवार पुन्हा निवडून येणे गरजेचे असल्याचे रामपाल सिंह म्हणाले.यावेळी वनिता कानडे, शांताराम चौधरे आदींची भाषणे झालीत. सभेचे संचालन हनुमान काकडे यांनी केले. या सभेनंतर डॉ. निशीगंधा वाड यांनी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे), विसापूर आणि बल्लारपूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ आयोजित जाहीर सभांना संबोधित केले. नागरिकांची प्रचंड उपस्थिती होती. अनेकांनी निशीगंधा वाड यांच्याशी बातचितही करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा उत्साह बघून त्या आनंदल्या. (शहर प्रतिनिधी)
सुधीर मुनगंटीवार यांना निवडून द्या
By admin | Updated: October 11, 2014 01:30 IST