पतीविरूद्ध तक्रार : छळ करीत असल्याचा आरोपचंद्रपूर : गोंदिया येथे कार्यरत एका महिला न्यायाधिशाने पतीपासून घटस्फोट मिळावा, यासाठी चंद्रपूर येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पतीविरूद्ध तथ्य व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.माधुरी अविनाश आनंद यांचा विवाह यवतमाळ येथील अविनाश धनपाल आनंद यांच्याशी २८ मे २००६ रोजी झाला. त्यांचे माहेर चंद्रपूरचे असून विवाहापूर्वीचे नाव मनोरमा नीळकंठ रायपुरे होते. त्यांनी विवाहनंतर स्पर्धा परीक्षा दिल्यावर आता त्या गोंदिया येथील न्यायालयात कार्यरत आहेत. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, पती अविनाश आनंद यांनी विवाहनंतर वकिली व्यवसाय सुरू करण्यासाठी दबाव टाकला. यवतमाळ येथे सहायक अधिवक्ता म्हणून काम सुरू केले. नियमित पैसे मिळत नसल्याने अपमानजनक बोलणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू झाले. त्यानंतर पती चारित्र्यावर संशय घेऊ लागले. गरोदर असताना एलएलएमचे थेसिस पूर्ण करण्यासाठी त्या माहेरी चंद्रपूरला आल्या होत्या. त्यावेळी पतीने शिवीगाळ करून यवतमाळच्या घरी पुन्हा परत यायचे नाही, असे बजावले.त्यानंतरही पती अविनाश आनंद मानसिक छळ करीत होते. वाशिम येथे न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळाल्यावर पती त्यांना पैशाची मागणी करीत होते. तेथेदेखील पती अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होते. पती अविनाश आनंद यांना मानसिक आजार असल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. त्यांना जिवे मारण्याची धमक्याही दिल्या आहेत. मानसिक व शारीरिक छळामुळे घटस्फोट देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
न्यायाधीशाचीच घटस्फोटासाठी याचिका
By admin | Updated: August 29, 2016 01:28 IST