चंद्रपूर : शहरातील रेल्वे स्टेशनसमोर उभारण्यात आलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या स्थानांतरणासाठी जागा निश्चित करावी व त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम करावे, अशा सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने पुतळा पुनर्स्थापनेची समस्या अखेर निकाली निघाली. ज्या जागेवर आधी पुतळा उभारण्यात आला होता त्या शेजारीच नवी जागा निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, नगरसेविका चंद्र्रकला सोयाम, धनराज कोवे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.
जे. जे. स्कूल ऑफ आर्टने यापूर्वी मंजूर केलेले ड्राॅईंग तपासण्याच्या सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना बैठकीत दिल्या. ज्या जागेवर आधी पुतळा उभारण्यात आला होता त्या जागेशेजारीच नवी जागा निश्चित करण्यात आली. याबाबत आवश्यक सर्व प्रक्रिया मनपा स्तरावर सुरू माहिती आयुक्त मोहिते यांनी दिली. आदिवासी समाजाच्या सर्व प्रमुखांनीही ती जागा मान्य असल्याचे सांगितले. नव्या जागेभोवती सौंदर्यीकरण करण्याचे मनपाने निश्चित केले. या कामाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे महापौर राखी कंचर्लावार यांनी यावेळी सांगितले.