बल्लारपूर : वेकोलि बल्लारपूर कालरी परिसरातील जुने मायनर्स, मध्य मायनर्स, सास्ती रोड मायनसर, फिल्टर प्लॉट मायनर्स या विविध समस्यांचे निवारण करण्याची मागणी नगरसेविका वर्षा सुंचूवार यांच्या नेतृत्त्वात नागरिकांचे शिष्टमंडळानी वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे वरिष्ठ अभियंता सोनटक्के यांच्याकडे निवेदनातून केली आहे. वेकोलि बल्लारपूर कॉलरी परिसरामध्ये जुने मायनर्स, मध्य मायनर्स, सास्ती मायनर्स, फिल्टर प्लांट मायनर्स या परिसरातील रस्त्यावर जीव घेणारे खड्डे आहेत. विद्युत खांबावरील पथदिवे बंद राहत असल्यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागतो. याकरिता परिसरातील नागरिकांनी समस्या सोडवाव्या यासाठी नगरसेविका वर्षा सुंचूवार यांच्या मार्फतीने वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. शिष्टमंडळाने बल्लारपूर वेकोलि क्षेत्राचे वरिष्ठ अभियंता सोनटक्के यांची भेट घेऊन समस्यांसंदर्भात चर्चा केली. रस्त्याने दररोज आॅटो आणि शाळेच्या वाहनाने विद्यार्थी ये- जा करतात. तर वृद्ध नागरिक याच मार्गावर फिरायला जातात. मात्र खड्यांमुळे कोणत्याही वेळी अपघात घडण्याची शक्यता आहे. पथदिवे बंद असल्याने रात्री या मार्गाने जाताना अंधाराचा सामना करावा लागतो. याशिवाय परिसरामध्ये असामाजिक तत्वाची भीती वाढलेली आहे. यावर तत्काल उपाययोजना करुन नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली गेली. समस्याचे निवारण झाले नाही तर, आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला.शिष्टमंडळात नगरसेविका वर्षा सुंचूवार, गीता कुडे, शोभा बगडे, अंजना गुंघरुटकर, सुषमा बाळबुद्धे, शालिनी ठाकरे, सुमन सूर्यवंशी, चंद्रकला मडावी, भुरा हलदर, चंद्रकला गायकवाड, अर्चना साळवे, अर्चना फुलझेले, जिजाबाई गुजरकर आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
खड्डे ठरताहेत जीवघेणे
By admin | Updated: September 20, 2014 23:47 IST