हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुलभ व सहजतेने पीक मिळाल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळेच शेतकऱ्यांना पीक कर्जाचा मोठा आधार वाटतो. यंदा राजुरा, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, सावली, मूल तालुक्यात कडधान्य लागवडीचे हेक्टरी प्रमाण वाढले. ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, सिंदेवाही तालुका भात उत्पादक आहे. मात्र, अनेक शेतकरी आता अपारंपरिक नगदी पिकांकडे वळत आहेत. गतवर्षी खरीप हंगामामध्ये सर्व बँकांमार्फत कर्ज वाटप करण्याबाबतची कार्यवाही दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांशी संपर्क साधून अर्ज सादर करणे व अन्य प्रक्रिया तातडीने पूर्ण केली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु, कोरोनामुळे यंदा रब्बी पीक कर्ज वितरणाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
बँकांना गाठता आले नाही उद्दिष्ट
जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांची नेमणूक करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी तपासली. याशिवाय बँकेकडून देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कारणांची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खात्री केली़ कर्ज देताना येणाऱ्या अडचणींना तत्काळ सोडविण्याची सूचनाही दिली. त्यामुळे महसूल व अन्य विभागांकडून बँकेला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली. गतवर्षी वेळेवर पीक कर्ज मिळल्याने अडचणी दूर झाल्या. यंदा कोरोनाच्या सावटात जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबविली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील कर्जाचे उद्दिष्ट बँकांना गाठता आले नाही. बँकनिहाय कर्ज वितरणाची माहिती प्रशासनानेही अद्याप जाहीर केली नाही.