लाभार्थ्यांना फटका : शासकीय योजनांचा निधी परत जाणार चंद्रपूर : येथील जिल्हा कोषागार कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून विविध योजनांचे देयके अडवून ठेवली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. या कारभाराचा फटका विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनाही बसत आहे. मार्च एडिंगच्या तोंडावर हा प्रकार घडत असल्याने लाभार्थ्यांत रोष पसरला आहे.कोषागार कार्यालयाकडून देयकाच्या प्रकरणात छोट्या-छोट्या त्रुट्या काढून विविध विभागांची देयकेच अडवून ठेवली आहे. यात सेवानिवृत्त कर्मचारीही सुटले नाही. या प्रकारामुळे शासनाचा विविध विभागांना मिळालेला निधी परत जाण्याची शक्यता असून विविध योजनांच्या लाभार्थ्यांनाही निधीपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.शासनाच्या विविध योजनांसाठी येणारा निधी आहारीत करुन तो विभागाना देण्याची जबाबदारी जिल्हा कोषागार कार्यालयाची आहे. मार्च महिना आता संपायला आठ दिवस आहेत. त्यामुळे सर्वच विभागाची निधी खर्च करण्यासाठी धावपळ सुरू आहे. शासन वेगवेगळ्या योजनांचा निधी सबंधीत विभागांच्या खात्यावर वर्ग करते. हा निधी संबंधीत विभागाला बीडीएसद्वारे उपलब्ध होतो. त्यानंतर संबंधीत रक्कम आहारीत करुन लाभार्थ्यांना द्यावी लागते. असे असताना वेगवेगळ्या विभागांद्वारे कोषागारात सादर करण्यात येणारी देयके जाणीवपूर्वक अडवून अथवा त्यात त्रुट्या काढून परत पाठविली जात आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटकाकोषागार कार्यालयात सदर प्रकार दररोज घडत आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण (स्टेट), जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग (स्टेट), जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी त्रस्त आहेत. दररोज कोषागारातून देयकांच्या फाईल परत येत असल्याने संबंधीत विभागाचे अधिकारी त्रस्त आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोषागार कार्यालयाच्या कारभाराचा चांगलाच फटका बसला. त्यांच्या वेतनाची देयके अडवून ठेवण्यात आणी शेवटी विनवणी केल्यानंतर त्यांची देयके काढण्यात आली.
कोषागार कार्यालयात देयके अडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:45 IST