चंद्रपूर : उन्हाळ्यात जंगलाला लागणाऱ्या वणव्यांमुळे जंगलातील महत्वाच्या वनस्पती नष्ट होत आहेत. दिवसाढवळ्या जंगलातून कुठून ना कुठून धूर निघताना दिसतो, तर रात्रीच्यावेळी रोशनाई केल्यासारखे आगीचे दृश्य दिसते. हा वणवा नेहमीच वने व वन्यजीवनांच नव्हे तर जैवविविधतेला धोका निर्माण करणारा ठरत आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या, असे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.चंद्रपू जिल्हा हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. त्यातच येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पदेखील आहे. यावर्षी ताडोबात मोठ्या प्रमाणावर आग लागली. त्यात वन विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागील वर्षीच्या तुलनेत तीव्रता जरी कमी असली तरी वणवा लागून वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. खाली पडलेल्या पालापाचोळ्यासोबत गवताचे हे इतर वनस्पतीचे बियाणे जळून खाक झाले. त्याचबरोबर लहान-लहान वनस्पती देखील नष्ट झाल्यात. एवढेच नव्हे तर गवतात राहणारे लावा, तितीर यासारख्या पक्ष्यासोंबतच असंख्य ससे, उंदीर यासारखे लहान-लहान व सरपटणारे प्राणी व त्यांची अंडी देखील आगीचे भक्ष्य ठरले. तसेच जैवविविधतेला पूरक ठरणारे किटक देखील यातून सुटले नाहीत. तृणभक्षी प्राण्यांचे खाद्यदेखील जळून खाक झाले. वनव्यामुळे वनसंपदा नष्ट होते, जैवविविधतेला धोका निर्माण होतो, ही दरवर्षीचीच ओरड आहे. पण दरवर्षी वनवा लागतो, ही बाबही नित्याचीच झाली आहे. यावर कायमस्वरुपी उपायोजना मात्र शासनाला किंवा प्रशासनाला अजुनपर्यंत करता आल्या नाहीत. हे त्यांचे अपयश आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तेंदुपत्ता, मोहफुले व डिंकासाठी जंगलात आग लावली जाते, हे वास्तव आहे. असे विघातक कृत्य करणारी माणसे जंगलालगतच्या गावामध्येच राहतात व अल्पश: कमाईसाठी संबंधित ठेकेदाराच्या आहारी जातात.परंतु हे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाकडून पाहिजे तसे प्रयत्न केले जात नाहीत. निसर्गचक्रामध्ये वने व वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्व आहे, ही बाब आता पाठय पुस्तकांपुरतीच मर्यादित राहिली आहे. जैवविविधतेच्या साखळीतील एखादी कडी जरी कमजोर झाली तरी त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. अशीच परिस्थिी राहिली तर जंगलातील प्राणी गावामध्ये व शेतामध्ये धुमाकूळ घातल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर मानवाला वरदान ठरणाऱ्या विविध औषधी वनस्पतीदेखील नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. (प्रतिनिधी)
जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर
By admin | Updated: May 13, 2015 00:05 IST