खडसंगी : शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी एक चाचणी परीक्षा व दोन मुख्य अशा तीन परीक्षा घेण्यात येतात. मात्र शिक्षक होण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या पाच चाचणी परीक्षा लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुजी बनण्याचा मार्ग आता खडतर झाला आहे.शासनाने लादलेल्या या पाच परीक्षांना सामोरे जाताना भावी गुरुजींची चांगलीच दमछाक होत असून यामध्ये वेळ व पैसाचा प्रचंड अपव्यय होत आहे. दहा वर्षापूर्वी डीएड, बीएड उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण पदावर सरळ निवड करण्यात येत होती. आता शिक्षक होण्यासाठी पाच परीक्षेच्या चाळण्यामधून उमेदवारांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागत आहे.एमपीएससी, युपीएससीमार्फत प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या प्रमुख तीन परीक्षा घेण्यात येतात. तर शिक्षक होण्यासाठी पाच चाळणी परीक्षा लादल्याने विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. भावी गुरुजींच्या परिक्षेमध्ये उमेदवारांची होणारी अत्यल्प गर्दी दूर करण्याकरिता शासनाने सवलत दिली. तरीही उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली नाही. सवलतीमध्ये उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज स्विकृती कक्ष सुरु करण्यात आले होते. सोबतच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५० टक्के तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४५ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली होती. मात्र यावेळी ही अट शिथिल करण्यात आली, तरीही उमेदवारांचा जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. उमेदवारांनी पात्रता सिद्ध करावी, यासाठी शासनाकडून विविध चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र शासनाच्या या भूमीकेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे. डी.एड., बी.एड., टीईटी परीक्षा न घेता शिक्षक भरतीसाठी सरळ सीईटी परीक्षा घ्यावी, अशी मागणी भावी गुरुजींची आहे. (वार्ताहर)
गुरुजी बनण्याचा मार्ग खडतर
By admin | Updated: November 12, 2014 22:40 IST