देवाडा खुर्द : शिक्षकांच्या मागे शासनाने विविध प्रकारची अशैक्षणिक कामे लावून ठेवली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बीएलओ व निवडणुकीशी संबंधित काम होय, या कामातून मुक्त करावे, अशी मागणी शासनाकडे शिक्षक व संघटनाद्वारे सातत्याने होत होती. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीनेही शिक्षणमंत्री, सहसचिव शालेय शिक्षण विभाग, मुख्य निवडणुक अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला होता. याबाबत निवडणुकीच्या कामातून अपंग व गंभीर आजारग्रस्तांना वगळणारा व काही घटकांना सुट देणारा शासननिर्णय निघाल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र शासनाचे उपसचिव व सहमुख्य निवडणुक अधिकारी निलेश गटणे यांनी कर्मचाऱ्यांना हा काही अंशी सूट देणारा आदेश १७ जुलैला नुकताच जारी केला.यामध्ये अपंग, गंभीर शारिरीक व्याधी व गंभीर आजारपण असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना या कामातून पूर्णपणे वगळण्यात येणार आहे. मात्र यासाठी सदर कर्मचारी निवडणूक कामकाज करण्यास असमर्थ असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमाणपत्राची गरज असणार आहे. तसेच महिला शिक्षिका किंवा स्त्री कर्मचाऱ्यांना दूरच्या व गैरसोयीच्या मतदान केंद्रावर नियुक्ती करु नये, त्यांना मतदान केंद्रावर रात्रीच्या मुक्कामापासून सुट द्यावी, गरोदर किंवा प्रसूती रजेच्या काळात निवडणूक कामकाज देऊ नये अशाप्रकारची सूट महिलांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना मतदारविषयक कामात ३० टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात नियुक्ती देऊ नये, निवडणूक जर दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत आल्यास पेपर तपासणीस व मॉडरेटर्स यांची नियुक्ती शक्यतो करु नये. मात्र याबाबत जिल्हाधिकारी वेळप्रसंगी योग्य तो निर्णय घेऊू शकतात. अशा विविध प्रकारच्या सूट देऊन शासनाने शिक्षक कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा नक्कीच दिला आहे.यासह एखाद्या कर्मचाऱ्यांचा निवडणुक कर्तव्य बजावताना अकाली मृत्यू उद्भवल्यास अशा प्रसंगी खात्री करुन संबंधितांच्या कुटुंबियास नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशीही तरतूद करण्यात आली आहे. या कामापाईच लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील एका शिक्षकाचा व बीएलओच्या कामामुळे भुसावळ येथील शिक्षकाचा नाहक जीव गेला होता, हे विशेष.तसेच शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार फक्त प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवसाचे काम सोडता सर्व शिक्षकांना बीएलओ व निवडणुक या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्त करावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. (वार्ताहर)
निवडणुकीच्या कामातून शिक्षक, कर्मचाऱ्यांना अंशत: दिलासा
By admin | Updated: August 6, 2014 23:46 IST