निर्णयाचे स्वागत : कार्यक्रमात केली घोषणावडाळा (तु) : लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरविलेल्या दोन मुली. गरीब म्हातारे आजोबा-आजी यांच्या छत्राखाली जीवन कंठीत आहे. म्हातारे आजोबा-आजी गेल्यानंतर त्यांना मायेचे पांघरूण कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून वरोरा-भद्रावती क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी त्या अनाथ असलेल्या दोन्ही बहिणींचे पालकत्व स्वीकारून तशी घोषणा केली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दादापूर येथे पार पडलेल्या पुण्यतिथी महोत्सवाप्रसंगी धानोरकर यांनी ही घोषणा केली. ग्रामस्थांच्या वतीने आमदार बाळू धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना माजी पंचायत समिती सदस्य रमेश गराटे यांनी सांगितले की दादापूर येथील मुली लहान असतानाच त्यांचे आईवडील चार वर्षाचे फरकाने प्रदिर्घ आजारामुळे मरण पावले व त्या दोन सख्ख्या बहिणी अनाथ झाल्या. म्हातारे आजोबा-आजी हलाकीच्या परिस्थितीत त्यांना कसेबसे सांभाळून त्यांना शिक्षण देत आहे. आता मुली मोठ्या झाल्या. त्यातील मोठी मुलगी तेजस्विनी रवींद्र चौधरी १४ वर्षाची असून वर्ग १० वीमध्ये शिकत आहे. लहान मुलगी सानिका रवींद्र चौधरी १० वर्षाची असून वर्ग ४ थीमध्ये शिकत असल्याची माहिती दिली. त्यावेळी आजी सखुबाई व आजोबा हरिचंद्र हरी चौधरी यांचे वयोमान ७० वर्षापेक्षा जास्त झाल्याने या दोन्ही मुलींच्या जीवनाची वाताहात होऊ नये व मायेच्या वात्सल्याची कमतरता जाणवू नये, या दृष्टिकोनातून तेजस्विनी व सानिका यांचे शिक्षणापासून ते विवाहापर्यंतचा सर्व खर्च करून स्वत: पालकत्व स्वीकारल्याचा बाळू धानोरकर यांनी जाहीर केले. यावेळी वरोरा पंचायत समितीचे सभापती सुनंदा जीवतोडे, पं.स. सदस्या हिरावती झाडे, भद्रावती पंचायत समितीचे माजी सभापती भोजराज झाडे, शेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर नरड, साखराचे शिवसेना शाखा प्रमुख दिवाकर निखाडे उपस्थित होते. आमदार बाळू धानोरकर यांनी तेजस्विनी व सानिका रवींद्र चौधरी यांचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने या दोन्ही मुलींचे पुढील आयुष्य चांगले जाईल आणि त्यांचे भविष्यही उज्ज्वल होईल, असा विश्वास मुलींचे आजोबा हरिचंद्र चौधरी व आजी सखुबाई यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले. (वार्ताहर)
मातृ-पितृत्व हरवलेल्या भगिनींचे स्वीकारणार पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 00:53 IST