भद्रावती : नारायण विद्यालय चंद्रपूर येथील पालक संघटनांनी शालेय शुल्क वाढ कमी करण्यात यावी, या मागणीसाठी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना अमरावती येथे जाऊन निवेदन दिले.
नारायण विद्यालय चंद्रपूर येथील प्रशासन दर वर्षाला विद्यार्थ्यांकडून १५ टक्के वाढीव शुल्क आकारत आहे. त्यामुळे दरवर्षी वाढीव शुल्क येत असल्याने पालकवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्या पालक संघटनांनी वाढीव शुल्क कमी करण्यासंदर्भात नारायण विद्यालय येथील प्रशासनाला वारंवार सूचना केल्या. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पालक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती येथे जाऊन शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले. या प्रकाराबाबत शहानिशा करण्यासाठी बच्चू कडू यांनी चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी उल्हास नरड त्यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून २०१४ ते २०१९ पर्यंत या विद्यालयाचे संपूर्ण ऑडिट करून आठ दिवसात अहवाल मागितला आहे. तसेच येथील पालकाकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले असल्यास त्यांना परत करून नारायण विद्यालयवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावेळी प्रहार विदर्भ संघटक गजू कुबडे, सचिन महाजन, विवेक जोगी, दत्त आंवडे, संजय नायर, राजू वेलेकर, प्रशांत डाहुले, स्नेहल मते, कविता गणफुले, मनिषा फुले व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.