घोसरी : आसोला तलावाच्या कराननाम्याखालील सिंचाई शाखा बेंबाळ अंतर्गतच्या टेलवरील धान पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणी पुरवठा करण्यास संबंधित अधिकारी हतबल ठरले. पाण्याअभावी ऐन गर्भातच पिकांना फूटवे निघाले. संपूर्ण पिके नष्ट होत आहेत. आधिच कर्जाचा बोजा असलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे.मूल-पोंभुर्णा तालुक्याच्या टोकावरील बेंबाळ-नांदगाव- घोसरी परिसरात मुख्यत्वे धान्याचे पीक घेतले जाते. परंतु निसर्गाच्या दृष्टचक्रात शेतकरी नेहमीच पिचला जात आहे. परिसरातील बेंबाळ नांदगाव, घोसरी, फुटाणा, गोवर्धन, बोंडाळा, दिघोरी येथील पिकेच्या नियोजनशुन्यतेमुळे शेवटच्या क्षणी पिकांना पाणी मिळत नसल्याने दरवर्षी पिकांना जबर फटका बसत असते. आसोला तलावात पाणी साठा अपुरा असताना नियोजनबद्धरित्या पाणी पुरवठा करणे गरजेचे होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीने आवश्यकता नसताना रोवणीकरिता कालव्याद्वारे मुबलक पाणी सोडण्यात आले. विशेषत: त्यावेळी पावसाने हजेरी लावलेली होती. वेळीच पाण्याचा काटकसरीने पुरवठा केला असता तर आजघडीला १०-१५ तारखेपर्यंत टेलवरील पिकांना पाणी पुरवठा होवून धानपिकांना संजीवनी मिळाली असती. परंतु अधिकारी सद्य:स्थितीत तलावात पाणी नसल्याचे हेरुन हतबलता दर्शविली आहे. परिणामी पाण्याअभावी टेलवरील धानपिके नष्ट होत असल्याने शेतकरी पुरता हतबल ठरलेला असून आर्थिक संकटाचा सामना करावा लागणारआहे. (वार्ताहर)
पाण्याअभावी धान पिकांना जबर फटका
By admin | Updated: November 10, 2014 22:41 IST