बी. यू. बोर्डेवार राजुरावेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील सर्वे क्रमांक ५८ मधील आराजी ७ एकर जमीन मुळता आदिवासींची आहे. या जमिनीवर वेकोलिने अतिक्रमण करुन एरिया हॉस्पिटलचे बांधकाम केले. त्यामुळे गेल्या अठरा वर्षापासून जागेचे मालक बंडू कुळमेथे हे लढा देत आहेत. मात्र, अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. पीडित आदिवासी बांधवांच्या तक्रारीवरून बनावट शपथपत्र तयार केल्याप्रकरणी बल्लारपूर क्षेत्रातील वेकोलिच्या तीन बड्या अधिकाऱ्यांसह इतर दोघांवर पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. यामुळे वेकोलि परिक्षेत्रात खळबळ उडाली असून, एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये वेकोलिचे अधिकारी आर. डी. शर्मा, सी.व्ही. रामानुजम, एरिया मॅनेजर विक्रम परांजपे यांच्यासह गंगाधर कुळमेथे, गणेश कुळमेथे या दोघांचा समावेश आहे. त्यांच्यावर भांदवि ४२०, ४६७, ४७१ (३४) अन्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. आदिवासी बांधवाची करोडो रूपयांची जागा असताना वेकोलि प्रशासनाने मात्र, त्यांची फसवणूक करून जागा हळपली. न्यायासाठी आदिवासी बांधव हेलपाट्या मारत आहेत. मात्र त्यांना गेल्या १८ वर्षापासून न्याय न मिळाल्याने संतप्त आदिवासींनी सोमवारी हॉस्पिटलला कुलूप ठोकण्याकरीता एकत्र आले. वेकोलिने अतिक्रमण केलेल्या जागेचे मुळ मालक बंडू कुळमेथे, माला सलामे, बबीता गेडाम हे आहेत. या जमीनीची आजच्या स्थितीत किंमत २० कोटींच्या घरात आहे. मात्र, त्यांची फसवणूक झाल्याने जमीन गेली. त्यामुळे त्यांना घरोघरी जाऊन धुणीभांडी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. वेकोलिच्या या वेळकाडू धोरणामुळे या आदिवासी बांधवावर उपसामारीची पाळी आली आहे.सोमवारी पीडित आदिवासींनी केलेल्या आंदोलनाच्यावेळी जी. एम. कार्यालयात मुख्य महाप्रबंधक परिचालन एस. के. जैन, तहसीलदार सीमा अहीरे, राजुराचे ठाणेदार विलास निकम, एरिया सुरक्षा अधिकारी चेस्टी सिद्धम, भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ. लखन अडबाले, बादल बेले, शेतमालक बंडू कुळमेथेसह अन्य शेत मालकाच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी शेत मालकांनी जागेचे २० कोटी रुपये आणि सात व्यक्तींना नोकरी देण्याची मागणी केली. येत्या १६ मार्चला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तळजोड करण्याबाबतचे पत्र महाप्रबंधक एस. के. जैन यांनी जमीन मालकांना दिले.
करोडोंचे मालक घासतात भांडी
By admin | Updated: March 11, 2015 01:02 IST