घुग्घुस : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या मुंबई महामार्ग नंबर ७ चंद्रपूर-घुग्घुस-वणी मार्गावरील पुलावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे सळाखी तुटू लागल्या असून पुलाचे आडवे लोखंडी गडर दिसू लागले आहे. या सळाखींचा धोका वाढला असून याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावरुन रात्रंदिवस कोळसा वाहतूकीबरोबरच मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांची वर्दळ असते. मात्र मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या डागडुजीकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस पुलाची दुर्दशा आणखी वाढली आहे. आजमितीला पुलावर जागोजागी खड्डे पडले असून त्यामुळे सलाखी उघड्या पडल्या आहेत. आडवे लोखंडी गडर बाहेर दिसत असून सळाखी तुटून पडत आहे. तुटलेल्या सलाखीपासून जड वाहनाला व विशेषत: दुचाकी वाहने व चालकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वर्धा नदीच्या काठावर वेकोलिने माती टाकली. पुरामुळे पुलाचा शेवटचा पिलर नजीकची माती वाहून गेल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी आरमुगम यांच्या कार्यकाळात एक पिल्लर वाढविला होता. त्यानंतर मात्र, पुलाची डागडुजी झालेली नाही. पुलाच्या दूरवस्थेबाबत प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची वेळ प्रशासनाकडे नसल्याचे दिसून येते. सदर पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वेकोलि कामगार संघटना, ईबादुल सिद्दिकी सह अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. (वार्ताहर)
वर्धा नदी पुलावर सळाखी बाहेर
By admin | Updated: March 3, 2015 00:57 IST