लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोविड प्रतिबंधक लसीकरणाला पाच महिने होत असूनही जिल्ह्यातील २२ लाख ४२ हजार ६२ लोकसंख्येपैकी बुधवारपर्यंत फक्त ३ लाख ४४ हजार ६७० नागरिकांनीच लस घेतली. जिवतीत सर्वात कमी तर भद्रावती तालुक्यात लस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेची सज्जता दखलपात्र आहे. मात्र जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता याच गतीने मोहीम सुरू राहिल्यास लस मिळण्यास किती वर्ष लागणार, असा प्रश्न नागरिक आता विचारू लागले आहेत.जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू करताना आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांची नोंदणी केली. त्यामध्ये हेल्थ केअर वर्क, फ्रंट लाईन वर्कर, सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील आणि १९ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून लस पुरविण्याचे नियोजनच कोलमडले. त्यामुळे मोठा गाजावाजा करून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याच्या घोषणेचा फुगा फुटला. या गोंधळात राज्यांवर अवलंबून असणाऱ्या मनपा आरोग्य विभाग व जि. प. आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. अखेर १८ वर्षांवरील लसीकरण थांबविण्यात आले. आता ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे दैनंदिन नियोजन जिल्हा आरोग्य यंत्रणेला करावे लागत आहे. डोस मिळाले तर केंद्र सुरू अन्यथा बंद अशी कसरत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करीत आहेत. जिवतीत सर्वात कमी ५ हजार २६७ जणांनी तर भद्रावती तालुक्यात तालुक्याच्या तुलनेत २८ हजार ४७४ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात लस घेण्यास पात्र असणाऱ्या २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांपैकी आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ६७० जणांना डोस घेता आले. जिल्ह्यात बुधवारी १४ हजार डोस आल्याने ११० केंद्रांवर लसीकरण सुरू झाले.
तिसऱ्या लाटेच्या भीतीने केंद्रांवर गर्दीजिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख घसरत आहे. ही दिलासादायक बाब आहे. तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने प्रत्येक नागरिकाला प्रतिबंधात्मक लस पुरविणे तातडीची गरज आहे. केंद्र सरकारचे लस धोरण नियोजन फसल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या धास्तीमुळे नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत.
चंद्रपुरात फक्त ७६ हजार जणांनीच घेतला डोसचंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात ३ लाख ५५ हजार १६१ नागरिक लस घेण्यास पात्र आहेत. त्यापैकी बुधवारपर्यंत ७६ हजार ७०१ नागरिकांनी डोस घेतला. यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्या ३३ हजार ३५ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मनपाने केंद्र वाढवून पुरेशी लस मिळत नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील लसीकरणाचे प्रमाणही अल्पच आहे.
लसीअभावी मोहिमेत खोडा६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी चंद्रपूर मनपा क्षेत्रात सात आठ केंद्र सुरू असतात. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरी परत जावे लागते. परिणामी, नागरिकांचे लसीकरण मंदावले आहे. पुरेसे डोस मिळाले तरच लसीकरण पूर्ण करून कोरोनाविरूद्ध लढा देऊन मात करता येऊ शकेल.