चंद्रपूर : दिव्यांगांना आधार देण्याच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूरच्या वतीने आर्थो बॅक हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत दिव्यांगांना गरजेचे साहित्य मिळत असल्याने त्यांना दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात हा पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जात आहे. दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत आहे. यामध्ये पाय, हात यांसह अनेक अवयवांना इजा होत असल्याने उपचार घ्यावा लागतो. काहीचे अवयव ठीक होतात, तर अनेकांना अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा दिव्यांगांना व्हीलचेअर, वॉकिंग स्टिक, फोल्डिंग वॉकर, स्पाइन बेल्ट, ब्रेसेज क्रचेस, कमर पट्टा, आदी साहित्यांची गरज भासते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठीच अडचण येत असल्याने, हे साहित्य घेण्यास मोठी कसरत करावी लागते. अशा दिव्यांगांना आधार देण्याच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने जिल्हा परिषद सामोरील सुश्रृषा हॉस्पिटलमध्ये आर्थो बॅक सुरू करण्यात आली. या बॅकेचे उद्घाटन डॉ.योगेश सालफडे यांच्या हस्ते पार पडले. या आर्थो बॅकमधून दिव्यांगांना जे साहित्य हवे आहे. ते साहित्य माफक दरात घेऊन जाऊ शकतो. या उपक्रमाचा दिव्यांगांना मोठा फायदा होत आहे. उद्घाटनाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ.विद्या बांगडे, क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग, सचिव पूनम कपूर, डॉ.प्रमोद बांगडे, कल्पना गुप्ता, अमोल पोटुदे, दुर्गा पोटुदे आदी उपस्थित होते. क्लबच्या सचिव पूनम कपूर यांनी आभार मानले.
रोटरी क्लबतर्फे दिव्यांगांसाठी आर्थो बॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:28 IST