मूल पोलिसांची कारवाई : साकोलीवरून सुरू होती तस्करीमूल : साकोलीवरुन नागभीड-सिंदेवाही-मूलमार्गे चंद्रपूरला टाटा सुमोने ५० देशी दारूच्या पेट्या नेत असताना मूल पोलिसांनी नाकेबंदी करून १ लाख २० हजारांची देशी दारू जप्त केली. संजय माधव वासेकर (३८) रा. चंद्रपूर व हिरा जनार्धन वाघमारे (४६) रा. चंद्रपूर अशी आरोपींची नावे असून मूल पोलिसांनी कलम ६५ क खंड ३८३ मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने अवैध मार्गाने दारू आणून जास्त भावाने विकण्याचा सपाटा काही दारू तस्करांनी सुरू केला असल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यात सर्तकतेचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला होता. रात्रीच्या वेळी मूल पोलिसांनी पोलीस निरीक्षक विखे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकेबंदी सुरू केली आहे. १६ मेच्या रात्री पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस शिपाई सुनील मेश्राम, उज्ज्वल साखरकर, मनोज जांभुळे, भगवान चौधरी, नासीर शेख, प्रभाकर पिसे, नरेश रामटेके यांच्या पथकाने मूलच्या बसस्थानकाजवळ एका टाटा सुमोला (एम.एच. ३४, ए.एम. ४५०६) अडवून तपासणी केली असता त्यात ५० देशी दारूच्या पेट्या आढळल्या. सदर दारूची किंमत १ लाख २० हजार रुपये व टाटा सुमोची किंमत सात लाख रुपये एकूण ८ लाख २० हजार असल्याचे मूल पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. आरोपी संजय माधव वासेकर व हिरा जनार्धन वाघमारे यांच्यासह टाटा सुमो जप्त घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विखे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलिसांचे पथक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
मूलमध्ये १ लाख २० हजार रुपयांची देशी दारू जप्त
By admin | Updated: May 18, 2015 01:13 IST