चंद्रपूर : शेतीत रासायनिक खताच्या प्रमाणामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. त्याचे दुष्परिणामही समोर येत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कसे वळणार, यासाठी शासकीय स्तरावरुन उपाययोजना केल्या जात आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेत यंदाच्या खरीप हंगामासाठी ‘ढैंचा’ बियाणे उपलब्ध करून दिले आहे. जिल्हाभरात तब्बल २२८.२0 क्विंटल ढैंचा बियाणे पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून शेकडो एकर सेंद्रिय शेती फुलणार आहे.धान उत्पादक पट्टय़ातील शेतकर्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणारे ढैंचा बियाणे सोयाबीन व कापूस पिकविणार्या शेतकर्यांसाठी फायदेशीर आहे. दिवसागणिक वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला कृषितज्ज्ञ देत आहेत. मात्र अजूनही शेतकरी रासायनिक खताची मागणी करीत आहे. पिकांसाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खत वापरण्याकडे शेतकर्यांचा कल वाढावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला असून सेस फंडातून ८ लाखाची तरतूद ढैंचा बियाण्यांसाठी केली आहे. ७५ टक्के अनुदानावर शेतकर्यांना बियाणे पुरवठा करण्याचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून खरीप हंगाम २0१४ करिता जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना २८८.२0 क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. शेतकर्यांना सदर बियाणे अनुदानावर ९२५ रुपयात मिळणार असल्याची माहिती कृषी सभापती अरुण निमजे व कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)
‘ढैंचा’ बियाणे फुलविणार सेंद्रिय शेती
By admin | Updated: June 9, 2014 23:33 IST