चंद्रपूर : युपीएससीच्या धर्तीवर आता एमपीएससीच्या परीक्षेवरही संधीचे बंधन आले आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे तर काहींनी स्वागत केले आहे. खुल्या गटासाठी सहा संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे जाहीर करण्यात आले तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी उपलब्ध राहणार आहे.
विद्यार्थी शासकीय नोकरीत सेवा करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून एमपीएसची तयारी करतातात. यामध्ये त्यांचे उमेदीचे अनेक वर्षे निघून जातात. मात्र संधी मिळाली नाही तर ते नैराश्यात येतात. त्यामुळे अनेकांचे भविष्यही धोक्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाने आता परीक्षा देण्यासाठी मर्यादित संधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या संधीमध्ये जर विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांना दुसरे पर्याय खुले राहणार आहे. त्यामुळे एकाच परीक्षेत ते गुरफटणार नसल्याचे विचारवंतांचे म्हणणे आहे. दुसरीकडे काही संघटनांनी या संधीला तीव्र विरोध केला आहे. आरक्षण असतानाही संधी मर्यादित करून अन्याय केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
--
विद्यार्थ्यांवर अन्याय
एमपीएससीने घेतलेला निर्णय अयोग्य असून एमपीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. विद्यार्थी अनेक वर्षे अभ्यास करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा परीक्षेची तयारी करण्यात वेळ जातो. पेपर समजून घ्यावा लागतो. त्यामुळे मर्यादित संधीमुळे ते वंचित राहणार आहे.
-साईनाथ वाढई
मूल
---
अधिकारांवर गदा
मर्यादित संधीमुळे विद्यार्थ्याचे नुकसान होणार आहे. घटनेने दिलेल्या अधिकारांवरच गदा आणणारा निर्णय आहे. त्यामुळे अनेकांचे स्वप्न धुळीस मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेणे गरजेचे आहे.
-मुन्ना लोणारे
पोंभूर्णा
----
इतर पर्याय खुले होतील
मर्यादित संधी असल्यामुळे ज्यांना खरोखरच एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे तेच विद्यार्थी अभ्यास करतील. जर विद्यार्थ्यांनी दिलेल्या संधीमध्ये परीक्षा पास केली नाही तर त्यांना इतर पर्याय खुले होतील. एकाच परीक्षेच्या मागे राहून वर्ष वाया जाणार नाही.
-वैभव ढोके
कोरपना
----
स्वत:तील क्षमतेची तपासणी होईल
एमपीएससीने घेतलेला निर्णय योग्य आहे. स्वत:मधील क्षमतेची तपासणी होणार आहे. जर संधी हुकली तर इतर पर्याय मोकळे राहणार आहे. एकाच परीक्षेकडे लक्ष न देता इतर पर्याय विद्यार्थ्यांसमोर असेल.
-महेश पलनती
चंद्रपूर