सुप्रिया सुळे : बांबू प्रशिक्षण केंद्राला भेट लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर व महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागातील जंगलामध्ये असणाऱ्या विपूल वनसंपदेला उद्योग आणि रोजगारामध्ये परिवर्तीत करणारे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही या भागातील नागरिकांना मिळालेली संधी आहे. या केंद्रामार्फत मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. खासगी दौरावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी चिचपल्ली येथील केंद्राला सोमवारी भेट दिली. यावेळी त्या बोलत होता. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्र उभे राहत असून या माध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती व कौशल्य विकासातून अर्थाजनाला चालना मिळण्याची अपेक्षा केली जाते. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून पुढील वर्षभरात चिचपल्ली येथे याची भव्यवास्तु उभी राहणार आहे. सद्या वनविभागाच्या जागेवर गडचिरोली मार्गावर या केंद्राला सुरुवात झाली असून प्रशिक्षणार्थ्यामार्फत संशोधन व निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पाबद्दल उत्सुकता असून खाजगी दौऱ्यावर असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी या केंद्राला आर्वजून भेट दिली. या भेटी दरम्यान या केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी त्यांना या ठिकाणी चालणाऱ्या प्रशिक्षण व संशोधनाची माहिती दिली. या केंद्राच्यामार्फत चंद्रपूर व परिसर ईशान्य भारताच्या अनेक प्रदेशाशी जोडल्या जाणार असून येथील बांबूपासून निर्मिती वस्तुंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर विक्री केंद्र उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. खासदार सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.
बांबू प्रशिक्षण केंद्रातून रोजगाराची संधी
By admin | Updated: June 1, 2017 01:34 IST