मेळावा : श्रमिक एल्गारचे आयोजनचंद्रपूर : शासन निर्णयानुसार कायदेशीर हक्क मिळावा, यासाठी ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटरच्या विदर्भस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात अन्यायाविरोधात लढण्याचा निर्णय घेण्यात आला.स्थानिक संताजी सभागृहात घेण्यात आलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अँड. पारोमिता गोस्वामी होत्या. याप्रसंगी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, विजय कोरेवार, पुष्पा नेवारे, सुलेमान बेग, संजय बोरकर, पंकज बुरांडे, दिनेश मातेरे, संगीता गेडाम यांची उपस्थिती होती. शासनाने शासन निर्णयात डाटा एंट्री ऑपरेटरना आठ हजार रुपये मानधन देण्याचे कबूल केले. मात्र, प्रत्यक्षात निम्म्यापेक्षा कमी मानधन देऊन महाऑनलाईन ही कंपनी त्यांचे शोषण करीत आहे. काम करून घेत असताना गुलामासारखी वागणूक देत आहेत. त्या निषेधार्थ व अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्यात चंद्रपूरसह वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील ऑपरेटर सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अँड. पारोमिता गोस्वामी यांनी डाटा एंट्री ऑपरेटरचे होत असलेले शोषण हे सुशिक्षित तरुणांचे शोषण असल्याचे सांगितले. आपण छोटे आहोत ही आपली ताकद आहे व जे मोठे आहेत ही त्यांची कमजोरी आहे, असे सांगून हा लढा श्रमिक एल्गार आंदोलनात्मक व कायदेशीर मार्गाने शेवटपर्यंत लढेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांनीही यावेळी मार्गदर्शन केले.मेळाव्याच्या आयोजनाकरिता धनराज रामटेके, दिनेश घाटे, विनोद जिवतोडे, निशा परिहार, मंगला चटारे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
अन्यायाविरोधात लढणार ऑपरेटर
By admin | Updated: June 3, 2014 23:59 IST