चंद्रपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेनंतर राज्य शासनासह आरोग्य प्रशासन हादरले. दरम्यान, रुग्णालयातील फायर ऑडिट करण्याचे आदेशही दिले आहे. मात्र चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती बिकट आहे. इलेक्ट्रिक उपकरणेही जागोजागी उघडेच आहे. विशेष म्हणजे, अतिदक्षता विभागाच्या अगदी समोरच वीज उपकरणे धोकादायक स्थितीत असून आरोग्य प्रशासन अपघाताची वाट बघत असल्याची स्थिती येथे बघायला मिळत आहे. या रुग्णालयाची प्रमुख जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची आहे. परंतु त्यांचे याकडे काहीही लक्ष नसल्याची बाब पुढे आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१६ मध्ये अग्निशमन यंत्रणेसाठी ४४ लाख ८५ हजार निधी मंजूर होऊन काम सुरू झाले. मात्र पाण्याच्या टाकीशिवाय काम पुढे सरकलेच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, प्रशासन फायर ऑडिट तसेच इलेक्ट्रिक ऑडिट होत असल्याचे सांगत आहे. मात्र तेही केवळ नावापुरतेच असल्याचे येथे फिरल्यानंतर दिसून येते. यासंदर्भात आरोग्य प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या वीज विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव गेल्यानंतरच जाग येणार का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.
कोट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर ऑडिट तसेच इलेक्ट्रिक ऑडिट नियमित होत आहे. माॅकडिलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना अपडेट ठेवल्या जात आहे. दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन गंभीर असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे.
- डाॅ. निवृत्तीनाथ राठोड
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर
---
पाहणीत काय आढळले?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयालयामध्ये इलेक्ट्रिक साहित्य तसेच फायर ऑडिट संदर्भात प्रशासन गंभीर नसल्याचे दिसले. रुग्णांची गैरसोय असून अनेकांच्या शस्त्रक्रियाही रखडल्या आहेत. डाॅक्टरने लिहून दिलेले औषध, गोळ्या रुग्णांना मिळत नसून बाहेरून खरेदी कराव्या लागत आहे. आयसीयूमध्ये केवळ ६ बेड आहे. रुग्णांची संख्या बघता ते कमी असून गंभीर रुग्णांवर उपचार कसे करायचे, असा प्रश्न डाॅक्टरांना पडत आहे. एमआयआरची, सीटी स्कॅनची सुविधा नाही.
ऑडिट न करण्यास जबाबदार कोण?
फायर ऑडिट करण्याची जबाबदारी नागपूर येथील फायर इंजिनिअरिंग काॅलेज व शासन नियुक्त अधीनस्त संस्थांककडे आहे. मात्र याकडे पाहिजे तसे लक्ष नाही. तसेच राष्ट्रीय बांधकाम संहिता २०१६ अंतर्गत बांधकाम आणि वीज व्यवस्था पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाच्या वीज विभागाकडे आहे. रुग्णालय परिसरात या विभागाने एक छोटेसे कार्यालय सुरू करून जबाबदारीतून मोकळे होण्याची प्रयत्न केला आहे. येथे कार्यालय नाही तर येथील व्यवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
माझा १५ डिसेंबरला अपघात झाला. यामध्ये डोक्यासह पायाला गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून रुग्णालयात उपचार घेत आहो. पायावर शस्त्रक्रिया करायची आहे. डाॅक्टर काही सांगायला तयार नाही. केवळ औषधोपचार सुरू आहे. माझ्यासारखेच अन्य रुग्णसुद्धा येथे आहे. मात्र पाहिजे तसे उपचार होत नाही.
- अपघातग्रस्त रुग्ण
अहेरी, जिल्हा गडचिरोली
----
मागील सहा महिन्यांपासून आपण पाय सुजत असल्याच्या कारणामुळे औषध घेण्यासाठी येथे येत आहे. अजूनपर्यंत उपचार योग्य झाला नाही. डाॅक्टर औषध लिहून देते. मात्र औषधही मिळत नाही. थाॅयराईडचीसुद्धा तपासणी येथे होत नाही. त्यामुळे आम्ही गरीब रुग्णांनी जायचे कुठे?
रुग्ण महिला
चंद्रपूर.
------