चंद्रपूर : महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ आणि राष्ट्रीय बांधकाम संहिता २०१६ अन्वये रुग्णालय उभारताना अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. मात्र, चंद्रपूर शहरातील १४ खासगी रुग्णालयातच ही यंत्रणा कार्यान्वित आहे तर १४ रुग्णालयांकडे याबाबत नाहरकत (एनओसी) प्रमाणपत्र नाही. त्यामुळे भंडाऱ्यासारखी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर सेंटरमधील दुर्घटनेनंतर शासकीय, खासगी रुग्णालो तसेच सर्व कार्यालये व मोठ्या व्यावसायिक संकुलांमध्ये अग्निशामक यंत्रणेबाबत सध्याची स्थिती काय, याचा आढावा घेण्याचे काम जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुरू करण्यात आले. चंद्रपूर मनपाच्या अग्निशामक विभागाच्या माहितीनुसार, अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी शहरातील २७ खासगी रुग्णालयांनी परवानगी मागितली. त्यानुसार, शासनाने अधिकृत केलेल्या एजन्सीकडून फायर ऑडिट करून यंत्रणा बसविण्याचे काम सुरू केले. आजमितीस १४ रुग्णालयात ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. परंतु, विविध कारणांमुळे १३ रुग्णालयांना अजूनही नाहरकत (एनओसी) प्रमाणपत्र मिळाले नाही. कामेही अर्धवट आहेत. अशा परिस्थितीत भंडाऱ्यासारखी दुर्घटना घडल्यास बचावासाठी कोणतीही उपाययोजना नाही. परिणामी, ही कामे विहित मुदतीत न झाल्याने दोषी कोण, त्यावर कारवाई का झाली नाही, असे प्रश्न पुढे आले आहेत.
अग्निशामक यंत्रणा नसलेली रुग्णालये
मल्टी हॉस्पिटल ॲण्ड युराेलॉजी सेंटर, गुरुदृष्टा नेत्रालय, बेंडले नर्सिग होम, देवतळे नर्सिग होम, त्रिनीती चिल्ड्रेन हॉस्पिटल, शिवजी चाईल्ड, केअर सेंटर, गुरूकृपा डायग्नोस्टीक क्लिनिक, गुरुकृपा क्लिनिक ॲण्ड नर्सिंग होम, धावंडे नर्सिंग होम, कान्शी डायग्नोस्टीक सीटी स्कॅन सेंटर, वासाडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पॉर्थ हॉस्पिटल, रिमोनन्ट टेस्टट्यूब बेबी सेंटर.
अग्निशामक यंत्रणा सुरू असलेली रुग्णालये
शिवजी चाईल्ड केअर सेंटर, मानवटकर मल्टिस्पेशालिटी, पार्थ हाॅस्पिटल, श्री साई डिवाईन क्युअर मल्टिस्पेशालिटी, संजीवनी आर्थोपॅडीक फ्रॅक्चर हॉस्पिटल, यश डायग्नोस्टीक सेेंटर, मुनगंटीवार आय हॉस्पिटल, यशोधरा हेल्थ केअर, आस्था हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पिटल, स्पर्श नर्सिंग होम, चि. व्यंकटेश हॉस्पिटल, मनोलक्ष्मी नर्सिंग होम
कामे अडली कुठे?
रुग्णालयात अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अन्वये शासनाने निकष ठरवून दिले आहेत. चंद्रपुरातील ज्या १३ रुग्णालयात ही यंत्रणा सुरू होऊ शकली नाही, त्याची विविध कारणेही पुढे आली आहेत. यामध्ये काम अर्धवट ठेवणे, कम्प्लिशन रिपोर्ट पेंडिंग, एजन्सीकडूच कामे अर्धवट, कागदपत्रांची पूर्तता न करणे, केवळ प्राथमिक निरीक्षण पूर्ण आणि अर्ज नमुना अ प्रलंबित ठेवणे आदी कारणांचा समावेश आहे.
कोट
मनपा क्षेत्रातील खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशामक यंत्रणा बसविण्यात आली किंवा नाही, याबाबतची माहिती तातडीने संकलित करण्यात आली. १३ रुग्णालयात ही यंत्रणा नाही, त्यामुळे या रुग्णालयांना झोननिहाय नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच वरिष्ठांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करू.
-अनिल घुमडे, अग्निशमन विभागप्रमुख, मनपा, चंद्रपूर