भद्रावती : एकाच मार्गाने चंद्रपूरकडे जाणाऱ्या कॅप्सूल ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात धडक दिली. यात कॅप्सूल ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला. ही घटना भद्रावती हद्दीतील चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील तहसील कार्यालयासमोर पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, धडक देणाऱ्या दुसऱ्या ट्रकचा आरोपी ट्रक तिथेच ठेवून पसार झाला. अपघातग्रस्त ट्रक गडचांदूर येथील रऊफ खाँ यांच्या मालकीचा आहे. ट्रक एम.एच. ३४ एम. ४९२४ चंद्रपूरकडे जात असताना मागून येणाऱ्या एम.एच. ३४ एम. ९४९७ या ट्रकच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात कॅप्सूल ट्रकच्या कॅबीनला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रक चालकाने नियंत्रण सुटून हा कॅप्सूल ट्रक ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकच्या मागे जावून धडकला. यात कॅप्सूल ट्रकची कॅबीन चेंदामेंदा झाली. त्यात चालक शिवानंद सिंह श्रीरामधनीसिंह मौर्य (२८) रा. गडचांदूर हा कॅबीनमध्येच दबल्याने गंभीररीत्या जखमी झाला. पोलीस यंत्रणा अपघातानंतर तब्बल दोन तासानंतर पोहोचली. यावेळेपर्यंत जखमी चालकाचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. सुमठाना येथील सामाजिक कार्यकर्ते कासीमभाई यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी पोहचून जखमी चालकास बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)
दोन ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू
By admin | Updated: November 3, 2014 23:22 IST