घुग्घुस : येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व नागपूर येथे गोळीबार हत्याकांडात मृत्यू झालेल्या शगीर ऊर्फ टिनू यांच्या भावासोबत झालेल्या वादविवाद मारहाणप्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्धही २९४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक करण्यात आली आहे.गुरुवारी दुपारी वणी-घुग्घुस मार्गावरील जोरा ज्वेलर्सजवळ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष खालील अहमद व मृतक शगीर ऊर्फ टिनू अहमद यांच्या भाऊ शबीर अहमद यांच्यात भांडण झाले. शबीर अहमद यांना इशारा देऊन धमकी दिली, यातून दोघात बाचाबाची झाली. त्यामुळे प्रकरण वाढले. खलील अहमद यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तर शबीर अहमद यांनीही तक्रार दाखल केली.नागपुरात २ डिसेंबरला मुख्यमंत्री यांच्या निवासस्थान परिसरातून आलिशान कारमधून आपल्या मित्रासोबत जात असताना शगीर ऊर्फ टिनू अहमद गोळी लागून गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागपूर पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. शगीर यांच्या नातेवाईकांकडून प्रकरणाची सीबीआयची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आणि हत्याप्रकरणी काही लोकांवर संशय व्यक्त केला. त्यात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष खालील अहमद यांचेही नाव आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा व पुढे हा प्रकार घडू नये यादृष्टीने दोघांविरुद्धही कारवाई केल्याचे पोलीस सूत्रांकडून कळले. (वार्ताहर)
तंटामुक्तीच्या अध्यक्षासह एकास अटक
By admin | Updated: January 3, 2015 00:48 IST