गोंडपिपरी : शहराच्या उत्तरेस राज्य मार्ग ९ ला जोडणारा गोंडपिपरी-मूल मार्ग पूूर्णता: उखडला आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामुळे दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनधारक त्रस्त झाले असून अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. मूलपर्यंतचे ४५ कि.मी. अंतर गाठण्यासाठी बसने तब्बल दीड तासाचा अवधी लागत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. गोंडपिपरी-मूल मार्गावर अनेक खेडी गावे आहेत. या मार्गावर परिवहन विभागामार्फत सोडण्यात येणाऱ्या बसफेऱ्या या जलद नसल्याने अंदाजे २० हून अधिक ठिकाणी बस थांबविण्यात येते. तर या मार्गावरील वाढती प्रवासी वाहतूक लक्षात घेता, दैनंदिन ये-जा करणारे विद्यार्थी, कर्मचारी व अन्य नागरिक यांना परिवहन विभागाचा तुघलकी कारभार व संथगतीने धावणाऱ्या वाहनामुळे अनेकदा वेळेवर पोहोचणे शक्य होत नाही.गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर जड वाहतुकीमुळे खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागामार्फत दरवर्षी केवळ रस्त्याची डागुजीतून करून खड्डे बुजविण्यात येते. मात्र महिना दोन महिन्याचा कालावधी लोटताच डागडुजीची कामे उखडून मार्ग पुन्हा त्याच स्थितीत होतो. खड्यामुळे अनेक दुचाकीस्वार अपघात होऊन गंभीर जखमी झाले आहे. तर काहींना प्राणही गमवावे लागले आहे. या मार्गावर कमी बसफेऱ्या असल्याने बसगाडीत भरगच्च प्रवास असतात. विद्यार्थी, वयोवृद्ध यांना बसमध्ये उभ्याने प्रवास करावा लागतो. आजवर या मार्गाच्या दुरूस्तीसाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले मात्र केवळ डागडुजीचे कामे झाली. मात्र वाढत्या जड वाहतुकीमुळे बांधकाम विभागाच्या कामाचा लाभ झाला नाही. (तालुका प्रतिनिधी)
४५ किमी अंतरासाठी दीड तासाचा प्रवास
By admin | Updated: February 26, 2015 00:49 IST