मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यात लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. यामध्ये आरोग्य कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली व ८ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना व नंतर सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. या पाच महिन्यांत तालुक्यातील चुनाभट्टी आणि भिवकुंड या दोन गावांत १०० टक्के लसीकरण झाले आणि विशेष बाब म्हणजे या दोन्ही गावांत संपूर्ण महामारीत एकही पॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. यामुळे कोविडमुक्त गावाचा बहुमान चुनाभट्टी व भिवकुंड या दोन गावाला मिळाला आहे.याशिवाय कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे भडकाम, कोर्टी तुकूम, बामणी (काटवली), काटवली, कळमना (बामणी) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे मोहाडी तुकूम, आसेगाव व विसापूर आरोग्य केंद्रांतर्गत हिंगणाळा, भिवकुंड व चुनाभट्टी या गावात कोरोनाबाधितांची संख्या शून्य आहे. या गावांनी सुरुवातीपासूनच कोरोनाला वेशीवरच रोखले. त्यामुळे बल्लारपूर तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या नऊ गावांची लोकसंख्या दोन हजार ४९३ असून १८ वर्षांवरील एक हजार ७४३ जणांनी लस घेतली आहे, तर व इतर एक हजार २६० जणांचे लसीकरण झाले आहे. आता फक्त ४८३ जणांचे लसीकरण बाकी आहे.
लसीकरण मोहीम जोरात
बल्लारपूर तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३२ गावे येतात. या सर्व गावात लसीकरण मोहीम जोरात सुरू असून, तहसीलदार संजय राईंचवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांच्यासह गावपातळीवर जनजागरण मोहिमेत तिन्ही प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गावातील नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहन देत आहे. यामुळे तालुक्यातील एक लाख ३४ हजार ९८० नागरिकांपैकी ४५ वर्षांवरील ३९ हजार ३३३ जणांचे लसीकरण झाले आहे. प्रत्येक गावात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.