शासनाची योजना : बळीराजाने संधीचा फायदा घेण्याचे आवाहनघोडपेठ : आतापर्यंत मौल्यवान वस्तू तसेच व्यक्तींचा विमा काढता येणे शक्य होते. मात्र आता, शासनाच्या पशुधन विमा योजनेद्वारे जनावरांचाही विमा काढणे शक्य झाले आहे.१ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या दरम्यान शासनातर्फे पशुधन विमा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. घोडपेठ येथेही पशुपालक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने पाळीव पशुंचा विमा उतरवत आहेत.शेतीसोबतच जोडधंदा करणे आवश्यक बनल्यामुळे बरेच शेतकरी दुग्धव्यवसायासाठी दुधाळू जनावरे पाळतात. मात्र, बरेचदा पावसाळ्यात रोगांची लागण झाल्यामुळे, अपघातामुळे, वीज पडल्यामुळे किंवा इतरही अनेक कारणांमुळे जनावरे दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. मात्र आता, शासनाच्या पशुधन विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांचे व इतरही पशुपालकांचे होणारे हे नुकसान टाळता येणार आहे.महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व दी न्यू इंडिया एश्योरेन्स कंपनी लि. यांच्या समन्वयाने असलेली पशुधन विमा योजना ही भारत सरकार व महाराष्ट्र शासन अनुदानित आहे. पॉलिसी कालावधीत पशुधनाचा मृत्यू हा आजारपण, अपघात, आग, वीज पडणे, पूर, वादळ, भूकंप, दुष्काळ व दंगलीमुळे झाल्यास नुकसान भरपाई मिळणार आहे.पशुपालकाने विमा प्रस्ताव देताना प्रस्ताव पत्रासोबत शासकीय पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जनावरांचा मालक व बिल्ला असलेला फोटो तसेच विमा धारकांचा मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.विमा दाव्याच्या संदर्भात जनावरांचा मृत्यू झाल्यास तशी सूचना जनावराच्या मालकाने दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर २४ तासाच्या आत देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)घोडपेठ पशु वैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातील पंधरा गावांतील पशुंचा विमा काढणे सुरू आहे. पशुधन विमा पंधरवाडा अंतर्गत जास्तीतजास्त पशुपालकांनी तसेच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, पशुवैद्यकीय अधिकारी, घोडपेठ.
आता जनावरांनाही विम्याचे संरक्षण
By admin | Updated: August 11, 2016 00:45 IST