चौकशी सुरू : लाखोंचे प्रोटीन पावडर उंदरांनी खाल्लेचंद्रपूर : जिल्हा परिषदेकडून गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांसाठी पुरविण्यात आलेले प्रोटीन पावडर गरजू लाभार्थ्यांना वितरित न करता पंचायत समितीच्या गोडावूनमध्ये ठेवले होते. लाखोंचा प्रोटीन पावडर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडल्याचे व उदरांनी नासधूस केल्याचे प्रकरण लोकप्रतिनिधींनी समोर आणल्यानंतर जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग खडबडून जागा झाला असून चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रथमदर्शनी सिंदेवाही पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी केवटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कक्ष अधिकारी सोनकर यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. सदर प्रकरणाचा अहवाल सोनकर यांच्याकडून सोमवारी सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. या अहवालानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरविली जाणार आहे.सिंदेवाही पंचायत समितीच्या गोडावूनमध्ये लाखो रुपयांचे प्रोटीन पावडर, शिलाई मशीन, सायकली व इतर साहित्य लाभार्थ्यांना वितरित न करता धूळधात पडल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिला व बालकल्याण विभागाकडून विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी दिलेले साहित्य वितरित केले की नाही, याची खातरजमा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान, सिंदेवाही पंचायत समिती वगळता इतर पंचायत समितीमध्ये कुठेही असा प्रकार झाला नसल्याचेही विस्तार अधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान सांगितले. काही पंचायत समितीमध्ये किरेकोळ साहित्य पडून असल्याचीही माहिती यावेळी समोर आली.महिला व बालकल्याण विभागामार्फत गतवर्षी जिल्हा निधीतून लाखो रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर हे साहित्य संबंधित पंचायत समितीकडे लाभार्थ्यांना पुरविण्यासाठी पोहचविण्यात आले. मात्र काही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी साहित्य वाटपाकडे दुर्लक्ष केल्याने गोडावूनमध्येच साहित्य पडून राहिले होते. सिंदेवाहीमध्ये तर लाखो रुपयांच्या प्रोटीन पावडरसह इतर साहित्याचीही मोठी नासधूस झाल्याचे दिसून आल्याने गरीब जनतेसाठी राबविण्यात आलेल्या योजनेचा अधिकाऱ्यांकडून कसा बोजवारा वाजविला जातो, हे स्पष्ट झाले. दरम्यान लोकप्रतिधींनी हे प्रकरण समोर आणल्यानंतर सिंदेवाहीच्या प्रकल्प अधिकारी गोत्यात सापडल्या असून सद्यस्थितीत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कक्ष अधिकाऱ्यांकडून चौकशीचा अहवाल लवकरच सादर होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
प्रोटीन पावडरप्रकरणी प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस
By admin | Updated: November 7, 2016 01:33 IST