सावली: तालुक्यातील चकपिरंजी ते व्याहाड (बु.) येथील बसस्थानकापर्यंतच्या चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय मार्गावर नऊ महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणाला जागोजागी ठिगळं लावून रस्त्याची डागडुजी करण्याचा गंभीर प्रकार ये-जा करणाऱ्यांना दिसून येत आहे.केंद्रीय राखीव निधीतून निर्माणाधिन असलेल्या १३ किलोमिटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे कंत्राट लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून सदर रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे. आठ कोटी रुपयांचे अंदाज पत्रक असलेल्या कामाला २४ महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु कंत्राटदाराच्या काम करण्याच्या कासवगतीने २४ महिन्याचे काम ३६ महिन्यातही पूर्ण होवू शकले नाही. याशिवाय या कामावर काळा दगड वापरण्यासाठी याच अंदाजपत्रकात पुन्हा एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याचे समजते. निधीची वाढ होवूनही या कामावर नाममात्र काळा दगड वापरुन ठिसुळ आणि पांढऱ्या रंगाचा दगड वापरण्यात आला आहे. त्यामुळे डांबरीकरणाचे काम अत्यंत सुमार दर्जाचे झाले असल्याचे बोलले जात आहे. चंद्रपूर- गडचिरोली हा राष्ट्रीय मार्ग म्हणून अलीकडेच जाहीर झाला आहे. तरीही नऊ महिन्यापूर्वीच करण्यात आलेल्या डांबरीकरणावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी ठिगळं लावून खड्डे बुजविण्याचा केवीलवाणा प्रयत्न कंत्राटदाराकडून केला जात आहे. अतिशय तकलादु प्रकारचे काम आणि निकृष्ठ साहित्याच्या वापरामुळेच दर सहा महिन्यात सदर राष्ट्रीय मार्गाची दुर्दशा पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तरतुदीनुसार डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार त्याच कामाची तीन ते पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्ती करतो. हे जरी खरे असले तरी खड्डे पडल्यानंतर त्याच कामातील खड्डे बुजविण्यासाठी वेगवेगळ्या हेडवर निविदा काढण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रस्त्यावरील खड्डयांमुळे अनेक अपघात घडले आहेत. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. संबंधीत कंत्राटदाराच्या निकृष्ठ साहित्य व डांबरीकरणामुळे चांगल्या मार्गाचे विद्रुपीकरण होत आहे. थातुरमातुर डागडुजी करुन ठिगळ लावण्याच्या प्रकाराने ये-जा करणारे प्रवासी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
नऊ कोटींच्या डांबरीकरणाला नऊ महिन्यात ठिगळ
By admin | Updated: March 14, 2015 01:08 IST