जागेची अडचण : प्रशासकीय कार्यवाहीत चालढकल चंद्रपूर : जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सन २०१३ ला जिल्ह्यात पाच नवे प्राथमिक आरोग्य केंद्र व ८ आरोग्य उपकेंद्रांना मंजूरी दिली होती. मात्र तीन वर्षाचा काळ लोटूनही शेनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता या आरोग्य केंद्रांच्या बांधकामाला सुरूवात झालेली नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सध्यास्थितीत ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत. मात्र अनेक गावातील नागरिकांना उपचारासाठी लांबवर जावे लागत आहे. रूग्णांची ही अडचण लक्षात घेता क्षेत्रफळाचा विचार करून राजुरा तालुक्यातील विरूर स्टे., कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, जिवती तालुक्यातील शेनगाव, गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी व आणखी एका ठिकाणी पाच नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना तत्कालीन आघाडी सरकारने मंजूरी दिली. लवकरच या आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून नव्या पदभरतीला मंजूरी मिळण्याची आशा होती. मात्र तीन वर्षे लोटूनही शेनगाव आरोग्य केंद्र वगळता इतर आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी जागा मिळू शकलेली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होताच ठराव घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची होती. यासाठी पाचही गावातील ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ठराव घेतले. मात्र जागा उपलब्ध होवूनही प्रशासकीय कार्यवाहीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे गावात प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी मिळूनही नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. सध्यास्थितीवरून या रूग्णालयांची कामे आणखी दोन-तीन वर्षे पूर्ण होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. (स्थानिक प्रतिनिधी) पोंभुर्णा व जिवती रूग्णालयाचा दर्जा जैसे-थे तत्कालीन आघाडी सरकारने जिल्ह्यात पाच नवीन प्राथमिक आरोग्य कें द्रांना मंजूरी देतानाच, पोंभुर्णा व जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रूग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे रूग्णालयात भौतिक सुविधात वाढ होवून रूग्णांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तीन वर्षे लोटूनही या रूग्णालयांना ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा न देता सुविधात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या आहेत जागेच्या अडचणी विरूर स्टे. आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली असली तरी बांधकामाचे टेंडर कार्यवाहीत असल्याचे सांगितले जात आहे. भंगाराम तळोधी येथेही हीच स्थिती आहे. नांदाफाटा येथील आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली. उपलब्ध जागा गायरान जागा असल्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला प्रस्ताव पुन्हा तहसीलदारांकडे परत पाठविण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी गेले ‘पीजी’ला जिल्ह्यातील ११ ग्रामीण रूग्णालये, ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३३९ आरोग्य केंद्रातील एकुण भरलेल्या पदांपैकी १५ वैद्यकीय अधिकारी व २ तालुका वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता गेलेले आहेत. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ते अधिकारी परततीलच याची काही शाश्वती नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
नव्या आरोग्य केंद्रांचे काम रखडले
By admin | Updated: January 4, 2017 00:50 IST