मासळ बु :
मागील वर्षाच्या तुलनेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने दररोज नवे रुग्ण समोर येत आहेत. कामानिमित्त शहराकडे हंगामी कामावर गेलेले कामगार, मजूर गावाकडे कडक लॉकडाऊन लागल्याने परत येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा, खाजगी शाळा व इतर शासकीय इमारती क्वारंटाइन सेंटर बनवाव्यात व गावात येणाऱ्या नागरिकांची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यावर्षी गावाकडील मजूर शहराकडे अल्प प्रमाणात गेले असले तरी हंगामी कामावर अनेक मजूर कामासाठी गेले आहेत. त्यासाठी त्यांना काही दिवस विलगीकरण कक्ष उभारून ठेवले तर आरोग्य विभागाला मदत व ग्रामीण भागातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यास मदत होईल. दररोज ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. आणि गावातील मजूर हंगामी कामासाठी शहरामध्ये गेलेले आहेत. मजूर परत येताच त्यांचे विलगीकरण केले तर गावासाठी सोयीचे होईल.
गावखेड्यातील नागरिक एकमेकांचा रोजच्या रोज संपर्कात येत असतात. असे असताना शहराकडून गावाकडे आलेल्यांचे कोरोना चाचणी करून विलगीकरण केले नाही तर गावखेड्यात आणखी कोरोना आजारांची रुग्णसंख्या वाढू शकते. आरोग्य विभागावर ताण पडू नये म्हणून प्रशासनाने याबाबत विचार करून तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
कोट
ग्रामीण भागातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी शाळा व इतर शासकीय इमारती क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतर केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो.
- प्रा. वामन बांगडे, माजी सरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत मासळ बु.