सुधीर मुनगंटीवार : राजुरा येथे एक हजार वृक्षांची लागवडचंद्रपूर : १८२० मध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली. मात्र या १९५ वर्षांत ५० टक्के जंगल नष्ट झाले. त्यामुळे ऋतूवर विपरित परिणाम झाला. त्याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहे. आज पावसाळ्याच्या दिवसातसुध्दा गर्मीचा सामना करावा लागत आहे. ही वेळ आपणच आपल्यावर आणली आहे. वीरांगणा अमृतदेवी यांनी पर्यावरणासाठी जीव दिला. मात्र आज पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणे गरजेचे आहे व झाडे लावण्यासाठी त्यांच्यावर जीव लावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पवनी येथे भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्य रविवारी आयोजित एक हजार रोपांची लागवड करण्याच्या कार्यक्रमात वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आ. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, साखरी येथील सरपंच भाऊ कोडापे, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅलीचे महामंत्री रमेश बल्लेवार, दिलीप सातपुते, अनिल बंडीवार आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली यांनी एक हजार रोपांची लागवड करण्याचा केलेला संकल्प अतिशय महत्त्वपूर्ण व अभिनंदनीय आहे. राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपण पूर्ण केला असून राज्य शासनाने वृक्ष लागवडीसंदर्भात नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपण केला आहे. हे लोकसहभागाशिवाय निश्चितच शक्य नाही. जनतेने ठरविले तर काहीही अशक्य नाही. वन विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतले आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या काळात आवश्यक तो निधी आपण उपलब्ध करून देऊ. राजूरा विधानसभा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी आ. संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे यांचीही समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
झाडे लावण्यासाठी त्यांच्यावर जीव लावणे गरजेचे
By admin | Updated: August 29, 2016 01:32 IST